मुंबई- रेल्वे कामगार आणि स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय हक्क, तसेच विविध मागण्यांसाठी गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेने सीएसएमटी स्थानकात मोर्चा काढला. यावेळी मध्य रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
रेल्वेचे खासगीकरण करून प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळ सुरू आहे. रेल्वेचे विविध कारखाने बंद करून ठेकेदारांना काम देणे सुरू आहे. निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याऐवजी अँप्रेटीस पास झालेल्या स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत सहभागी करून घ्या. कामगारांचे पेन्शन रद्द करण्याऐवजी आमदार खासदारांच्या पेन्शन बंद झाल्या पाहिजेत, अशा विविध मागण्या महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
आज आमच्या मागणीचे निवेदन देतोय. मात्र, आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास भविष्यात आम्ही मनसेच्या भाषेत उत्तर देऊ, असा इशारा मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष जितू मोरे यांनी दिला आहे.