मुंबई - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुः ख व्यक्त केले आहे.
"निलंगेकर हे सच्चे लोकनेते होते. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी शेतकरी व ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी वेचले. राज्य विधानमंडळाचे सदस्य म्हणून आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत तसेच मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांनी राज्याच्या प्रगती आणि विकासात बहुमोल योगदान दिले. श्री निलंगेकर यांचे राज्याप्रती योगदान तसेच त्यांची सामान्य जनतेप्रती बांधिलकी निरंतर लोकांच्या स्मरणात राहील" असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या शोक संदेशामध्ये म्हटले आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे आज पहाटे निधन झाले. ते ९१ वर्षाचे होते.
काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती बरी झाल्याने नुकतेच त्यांना घरी पाठवण्यात आले होते. मात्र, मूत्रपिंड निकामी झाल्याने बुधवारी पहाटे २ वाजून ३० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर आज निलंगा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.