मुंबई - इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जयंती सोहळा मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. या दिवशी धार्मिक प्रवचन होतात आणि मिरवणूक काढली जाते. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे आणि कोरोनावरील निर्बंध शिथिल केल्यामुळे हे सण साजरे केले जात आहेत. त्यासाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. यंदाच्या वर्षी 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी ईद ए मिलाद साजरी केली जाणार आहे. त्यासाठी राज्याच्या गृह विभागाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. त्यांचे पालन करूनच हा सण साजरा केला जावा असे सांगण्यात आले आहे.
यामध्ये मिरवणूक काढण्यासाठी पाच ट्रकांना परवानगी देण्यात आली आहे. त्यात असलेल्या लोकांव्यातिरिक्त अतिरिक्त 5 लोकांना पोलिसांची परवानगी घेऊनच सामील करता येईल. गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सण साजरे होऊ शकले नाही. यंदाच्या वर्षी कोरोनाचे प्रकरण कमी झाल्यामुळे सर्व सण साजरे केले जात आहेत. त्यासाठी काही नियमावली राज्य सरकारने जारी केली आहे. त्यांचे पालन करूनच सण साजरे केले जावे, असे सांगण्यात आले आहे.
ईदच्या जुलूसासाठी अत्यल्प लोकांना परवानगी दिल्याने नाराजी - नसीम खान
मंगळवारी असलेल्या ईद-ए-मिलाद उन नबीसाठी राज्य सरकारने जुलुसामध्ये सहभागी होण्यासाठी अत्यल्प लोकांना दिलेली परवानगी योग्य नाही. राज्यात शाळा, मंदिरे खुली होत असताना जूलूसामध्ये अधिक लोकांना परवानगी देणं आवश्यक होतं, अशी प्रतिक्रिया माजी अल्पसंख्याक मंत्री नसीम खान यांनी व्यक्त केली आहे. राज्यात मंगळवारी ईद ए मिलाद उन नबी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने राज्य सरकारने नुकत्याच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
मात्र एकीकडे राज्यात शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मंदिरे खुली करण्यात आली आहेत. तसेच महाविद्यालयेही लवकरच सुरु करण्यात येत आहेत, या सर्व पार्श्वभूमीवर ईद ए मिलाद उन नबीच्या जुलूसामध्ये केवळ 25 लोकांना परवानगी देणे हे वास्तवतेला धरून नाही. अन्य लोकांना अन्य उत्सवांमध्ये सहभागी होण्याची मुभा असताना मुस्लिम समाजाला जुलूस काढण्यासाठी अशा पद्धतीचे निर्बंध लावणे आणि केवळ 25 लोकांना दिलेली परवानगी यामुळे समाजातील एक वर्ग नाराज असल्याची प्रतिक्रिया अल्पसंख्यांक मंत्री आणि काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी दिली आहे.
काय आहेत मार्गदर्शक सूचना?
या सूचनांनुसार ईद ए मिलाद उन नबी निमित्त काढण्यात येणाऱ्या जुलूसामध्ये केवळ 25 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. पाच वाहनांच्या माध्यमातून प्रत्येक वाहनात केवळ पाच लोक अशा पद्धतीने जुलूस काढण्यात यावेत, असे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
मार्गदर्शक सूचनांप्रमाणे जुलूस निघेल- मलिक
दरम्यान, राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र अशा पद्धतीची कोणतीही नाराजी नसल्याचं म्हटलं आहे. राज्य सरकारने नेमून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे मुस्लिम समाजातील बांधव उत्सवात सहभागी होतील, असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे. तसेच ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.
हे ही वाचा -शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; वाचा, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा
काय आहे नियमावली -
- मिरवणूक काढण्यासाठी पाच ट्रकांना परवानगी देण्यात आली आहे
- सामाजिक अंतर राखणे बंधनकारक आहे.
- सेनेटायझर आणि मास्क वापरणे बंधनकारक आहे.
- मिरवणुकाच्या स्वागतासाठी पोलिसांच्या परवानगीने पंडाल उभारले जाऊ शकतात.
- साबिलीजवळ 5 लोकांना उभे राहण्याची परवानगी.
- मिरवणुकीत पाण्याच्या सीलबंद बाटल्या वितरण करणे बंधनकारक.
- लोकांनी मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी करू नये.
- मिरवणुकीत लोकांची संख्या पोलीस ठरवतील.
- या नियमावलीचे पालन करून सण साजरे करावे असे सांगण्यात आले आहे.