मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील हजारो शिक्षकांना कोरोना ड्युटी लावण्यात आली आहे. ग्रामीण भागामध्ये कोणत्याही सुरक्षेच्या साधनांशिवाय अनेक शिक्षक डॉक्टरांसोबत काम करत आहेत. राज्यभरात आजपर्यंत जवळपास २२१ पेक्षा जास्त शिक्षकांचा कोरोना नियंत्रणाच्या कर्तव्यावर असताना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या वारसांना शासनाकडून ५० लाख रुपये विम्याची भरपाई देण्यात येणार आहे. याबाबत शासन निर्णयसुद्धा काढण्यात आला आहे.
- अखेर काढला शासन आदेश -
राज्यात वर्षभरात अनेक शिक्षकांची मे २०२० पासून कोविडच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली होती. राज्यभरात आजपर्यंत जवळपास २२१ पेक्षा जास्त शिक्षकांचा कोविड नियंत्रणाच्या कामावर असताना मृत्यू झाला आहे. ही संख्या आता वाढली आहे. ५० लाखांच्या विमाकवच शिक्षकांना लागू केले नव्हते. यासंदर्भात शिक्षक परिषदेचे आमदार नागो गाणार यांनी सततचा पाठपुरावा केला होता. तसेच पत्रव्यवहार करुन मृत शिक्षकांच्या कुटुंबाची व्यथासुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली होती. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मुंबई विभागाने ४ पेक्षा अधिक पत्रे दिली, तसेच आमदार नागो गाणार यांची २०२० या वर्षभरातील याबाबतची पत्रे यांची दखल राज्य शासनाला घ्यावी लागली. शासन निर्णय निर्गमित झाल्यावरही काम होत नव्हते. प्रस्ताव पुढे पाठवले जात नव्हते. अखेर 26 जून 2021 रोजी मृत शिक्षक तौफिकअली बादशहा अत्तार यांच्या वारसदारांना ५० लाख रुपयांच्या विम्याची रक्कम मंजूर करण्यात आल्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. अशाप्रकारे ५० लाख विमा संरक्षण मिळवण्यासाठी चालू असलेल्या शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
- उर्वरित सर्व शिक्षकांच्या वारसांसाठी प्रयत्न सुरू-
शिक्षक आमदार नागो गाणार यांनी मार्च २०२१ पर्यंत दाखल झालेल्या प्रस्तावांसाठी पाठपुरावा सुरुच ठेवला होता. तसेच शिक्षक परिषद मुंबई कार्यवाह शिवनाथ दराडे यांचाही पाठपुरावा सुरूच होता. काही मृत शिक्षकांच्या वारसदारांनी विम्यासाठी केलेल्या अर्जांवर अजून निर्णय झालेला नाही. काही ठिकाणी प्रस्ताव सादर केलेले नाही. यांची संख्या आता ३०० च्या वर जाऊ शकते. त्यामुळे उर्वरित सर्व शिक्षकांच्या वारसांना ५० लाख रुपयांची रक्कम मिळावी यासाठी, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून पाठपुरावा सुरुच राहणार आहे. तसेच २०१३ पासून शालेय शिक्षण विभागात अनुकंपा भरती प्रलंबित आहे, त्यामुळे मृत शिक्षकांच्या वारसांना तत्काळ अनुकंपा तत्त्वावर नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी कायम आहे.