ठाणे - सीबीएससी, आयसीएसई शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्याचा पालकांचा वाढता कल आहे. या शाळांचे महत्व कमी करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शैक्षणिक बोर्ड (एमआयईबी) स्थापन केले आहे. यावर्षी दुसऱ्या टप्प्यात राज्यातील खासगी मान्यताप्राप्त 64 मराठी माध्यम शाळांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ व कल्याण येथील सेंच्युरी रेयान शाळेचा यात समावेश करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय जाणीवा समृद्ध करणारे शिक्षण मातृभाषेतून देता यावे, यासह मराठी माध्यमांच्या शाळांकडे पुन्हा पालकांचा कल वाढावा हा यामागील मुख्य उद्देश आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळातर्फे (एमआयईबी) पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या शाळांची निवड करण्यात आली होती. यावर्षी दुसऱ्या टप्प्यात राज्यातील खासगी मान्यताप्राप्त 64 मराठी माध्यम शाळांची निवड करण्यात आली आहे. विश्वस्त सल्लागार मंडळाची यासाठी नेमणूक करण्यात आली असून या समितीवर डॉ. अनिल काकोडकर, डॉ. विजय भाटकर, सोनम वांगचूक, डॉ. स्वरुप संपत, अच्युत पालव या तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे.
काही निवडक शाळांसाठी एमआयईबी बोर्ड मान्यता देण्यात आली आहे. मातृभाषेतून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणे, स्वयंअध्यनास प्रवृत्त करणे, पंचाकोशाधारित मूल्यमापन व्यवस्था निर्माण करणे, भारतीय मूलभूत ज्ञान व वर्तमान स्थिती यांची उत्तम सांगड घालता येणे, सहज शिक्षण घेण्यास प्रवृत्त करणे, हा या मागचा उद्देश असल्याचे मंडळाच्यावतीने सांगण्यात आले.
पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांना हे शिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या शाळांना अंगणवाडीही जोडण्यात आल्या आहेत. नंतर नैसर्गिकपणे पुढे वर्ग वाढत जाणार आहेत. शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्यांकडे लक्ष देता यावे, यासाठी 30 ते 35 विद्यार्थ्यांची पटसंख्या निश्चित करण्यात आली आहे. मुलांचे वार्षिक मुल्यपापन हे केवळ लेखी परिक्षेवरुन नाही, तर शिक्षकांचा अनुभव व पालकांना मुलांची किती प्रगती दिसून येते, असे पंचाकोशाधारीत मुल्यपापन केले जाणार आहे.
याबाबत टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक आर्शीवाद बोंद्रे, यांच्याशी संपर्क साधला असता, प्रकल्पाधारित हा अभ्यासक्रम असून शासनानेच तो आणल्याने त्याचे स्वागतच आहे. मराठी माध्यमाकडे पुन्हा मुलांचा कल वाढण्यास याने नक्कीच मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.