मुंबई : मला ईव्हीएम मशीनवर पूर्ण विश्वास असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. ज्यांना निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागते, त्यांनाच ईव्हीएमवर विश्वास नसतो असेही ते यावेळी म्हणाले. एकेकाळी भाजपाला विरोध करणाऱ्या पवारांनी, ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन भाजपाला बळ देणारे वक्तव्य पवारांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात याबाबत चर्चा रंगत आहेत.
नाना पटोलेंच्या भूमिकेशी विसंगत वक्तव्य..
स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांना ईव्हीएम व्यतिरिक्त मतपत्रिकेद्वारे देखील मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्याच्या सूचना नाना पटोले यांनी दिल्या होत्या. नाना पटोले विधानसभा अध्यक्ष असताना त्यांनी यासंबंधीची बैठक घेतली होती. नाना पटोलेंच्या या भूमिकेबाबत बोलताना पवार म्हणाले, की नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष असताना त्यांनी असे निर्देश दिले होते. अध्यक्ष असताना ते कोणत्याही पक्षाचे प्रतिनिधित्व करत नव्हते. सध्या ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. जर आता त्यांनी यासंबंधी मागणी केली, तर चर्चा होऊ शकेल असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे.
ईव्हीएम असतानाच राजस्थान, पंजाबमध्ये काँग्रेस सरकार..
ईव्हीएमवर माझा पूर्ण विश्वास आहे. आतापर्यंत मी सहा ते सात वेळा निवडणुका जिंकल्या आहेत. या सर्वांमध्ये ईव्हीएमचा वापर झाला होता. तसेच, राजस्थान आणि पंजाबमध्येही ईव्हीएम असतानाच काँग्रेसचे सरकार आले. त्यामुळे ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्याचा प्रश्न नाही, असे पवार म्हणाले.
याआधी पवारांनी व्यक्त केली होती शंका..
लोकसभा निवडणुकांमध्ये जेव्हा भाजपला केंद्रात बहुमत मिळालं, तसेच राज्यातही मोठ्या प्रमाणात यश मिळाले होते. तेव्हा राज्यातील बहुतांश विरोधी पक्षांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली होती, ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचाही सहभाग होता. कित्येक देशांमध्ये ईव्हीएमवर निवडणुका होत नाहीत, असे म्हणत पारदर्शक निवडणुकांची मागणी खुद्द अजित पवारांनी केली होती. तसेच, ईव्हीएमवर शंका घेण्यास वाव असल्याचेही ते म्हणाले होते.
राज्यपाल यांच्या हवाई दौऱ्या संबंधी माहिती नाही..
दरम्यान, भगतसिंह कोश्यारी यांच्या हवाई दौऱ्याप्रकरणी आपल्याला माहिती नव्हते, असेही पवारांनी स्पष्ट केले आहे. मी माझ्या कामात व्यस्त आल्याने त्या संदर्भाची माहिती नसून, यासंबंधी आपण पूर्ण माहिती घेऊ असे स्पष्टीकरण राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.
राज्यात कोणावरही अन्याय होऊ देणार नाही..
कोरेगाव-भीमा प्रकरणात आलेले संबंधित पुरावे हे तयार करण्यात आले असल्याची बातमी वॉशिंग्टन पोस्टने दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमके काय पुरावे आहेत याचा तपास केला गेला पाहिजे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. यामुळे सामान्य जनतेवर अन्याय होणार नाही याची शाश्वती अजित पवार यांनी दिली आहे.
हेही वाचा : 'ईटीव्ही भारत' इम्पॅक्ट : अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवर घेतला एकनाथ खडसेंचा फोटो