मुंबई - आज(गुरुवारी) दुपारी साडेतीन वाजता राज्यमंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढाव्यासह तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात सध्या सुरू असलेला लॉकडाऊनबाबतही महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे.
तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना भरपाई-
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्री वादळामुळे राज्याच्या कोकण किनारपट्टीभागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या आंबा, काजू, नारळांच्या बागांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून कोकणाला निसर्ग वादळाप्रमाणे मदत देऊ असे आश्वासन दिले होते. त्यावर आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन नुकसान भरपाईची मदत जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे.
पदोन्नती आरक्षण
मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यसरकारने यापुढे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय जारी केला. मात्र, याला महाविकास आघाडीतील काँग्रेसचा विरोध आहे. त्यावर देखील आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
कोरोना आढावा आणि लॉकडाऊन-
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या कमी होऊ लागला आहे. मात्र, म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे. तसेच तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरून त्यासंदर्भातील पूर्वतयारीचा आढावा घेतला जाईल. यामध्ये प्रामुख्याने राज्यात सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनची मुदत १ जूनला समाप्त होत आहे. त्यानंतर राज्यात लॉकडाऊन वाढवायचा का? आहे त्या परिस्थितीमध्ये शिथीलता द्यायची याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.