मुंबई - लोकसभा निवडणुकीनंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनी लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, याबाबत अद्याप कोणत्याही हालचाली दिसत नसल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार अधांतरीच असल्याचे सांगितले जात आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या आधी १४ जूनला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, आता विस्ताराबाबत केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भूमिका स्पष्ट करू शकतात, अशी प्रतिक्रिया भाजपच्या जेष्ठ नेत्याने दिली आहे. तसेच उपमुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये अजून कोणताही निर्णय न झाल्यानेही विस्तार रखडला असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेना आणि भाजपमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावरून काही धुसफूस होण्याची शक्यता वर्तवली जात होती. तसेच हायकमांड बरोबर झालेल्या महाराष्ट्र भाजप सुकाणू समितीच्या बैठकीतही भाजप अध्यक्ष अमित शाह यांनीही मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अधिक स्वारस्य दाखवले नसल्याचे भाजपच्या गोटात चर्चिले जात आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात विधानसभेच्या निवडणूक येऊ घातल्या आहेत. तत्पूर्वी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे नव्या मंत्र्यांना केवळ ३ महिन्याचा अवधी मिळत असल्याने हा विस्तार करू नये, असा विचार पक्षश्रेष्ठींनी घेतला असल्याचे चर्चिले जात आहे. तसेच शिवसेनेतही पक्षाबाहेरून आलेल्यांना संधी मिळत असल्याबाबत नाराजी आहे. माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील भाजपच्या गोटातून आणि राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले जयदत्त क्षीरसागर यांना विस्तारात प्रामुख्याने संधी मिळणार असल्याचे चर्चिले जात होते. मात्र, विस्ताराच्या कोणत्याही हालचाली नसल्याने त्यांचा ही विरस झाल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यपालांचे निवासस्थान असलेले राजभवन मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण आणि विधानभवनातील सेंट्रल हॉल हे स्थळ निश्चित करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. पण या ३ ठिकाणी शपथविधीच्या कार्यक्रमाची कोणतीही तयारी सुरू नाही. राजभवनातही शपथविधी होणार नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या राजभवन येथील कार्यालयातही शपथविधीच्या कार्यक्रमाची काहीही तयारी सुरू नसल्याची माहिती मिळाली आहे.
एका बाजूला मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, अशी चर्चा सुरू असताना याबाबत इतर पक्षातून भाजप-शिवसेनेत आलेले नेते उघड बोलायला तयार नाहीत. त्यामुळे या विस्ताराचे घोंगडे अद्याप भिजत पडल्याचे दिसून येत आहे.