मुंबई - उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथील घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (आज) महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला मुंबईत चांगला प्रतिसाद मिळाला. जीवनावश्यक वस्तू वगळता व्यापाऱ्यांनीही बंदला पाठिंबा दिल्याने दुकाने व इतर व्यवहार बंद होते. शिवसनेचे बालेकिल्ला असलेल्या परळ, दादर, लालबाग, वरळी, भायखळा आदी भागात रस्त्यावर उतरून जोरदार शक्तिप्रदर्शन करत कडकडीत बंद पाळला. केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी काळे कायदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात हाय हायच्या जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. मुंबईच्या डबेवाल्यांसह फेरीवाल्यांनीही महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला. फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने सत्ताधारी पक्षांच्या आवाहनामुळे ४ वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केल्याने दुकाने व इतर व्यवहार बंद होते. रस्त्यावरची वाहतूकही तुरळक सुरु होती. दादर, परळ, लालबागसह अनेक गजबजलेली ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळाला.
'या' ठिकाणी झाले आंदोलने
बंदमध्ये सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस ताकदीने उतरल्याचे चित्र होते. दादर, येथील शिवसेना भवन समोर आमदार सदा सरवणकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी साखळी आंदोलन करत रस्ता रोको केला. पालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत, विभाग प्रमुख यशवंत विचले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने आंदोलन सहभागी झाले होते. लालबाग, परळ येथे आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली येथे शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या, पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव वाढवणाऱ्या भाजपा सरकारच्या निषेधार्थ रास्ता रोको करण्यात आला. वरळी, लालबाग, चेंबूर आदी ठिकाणी शिवसेना रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन केले. केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. त्यामुळे काही वाहतूक कोंडी झाली होती. वरळी येथे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर याही ठिय्या आंदोलनात सहभाही झाल्या. कार्यकर्त्य़ांनी रास्ता रोको केल्याने पोलिसांनी शिवसेना नेते व माजी मंत्री सचिन अहिर यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तर राजभवन येथे काँग्रेसने मूक आंदोलन करून लखीमपूर घटनेचा निषेध नोंदवला. काँग्रेसचे वरिष्ठ नेते यावेळी सहभागी झाले होते. तर हुतात्मा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसने निदर्शने केली. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह वरिष्ठ नेते सहभागी झाले होते. लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ अनेक संस्था, संघटनांनीही बंदला पाठिंबा दिला होता. बेस्ट वाहतूकही पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या होत्या. आठ ठिकाणी बेस्टची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली. रस्त्यावर रिक्षा, टॅक्सी तुरळक प्रमाणात धावत होत्या. सरकारमधील घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. बेस्ट बसेस बंद राहिल्याने प्रवाशांचे हाल झाले.
हेही वाचा - Maharashtra band : चंद्रपूरमध्ये शिवसैनिकांकडून शिवभोजन देणाऱ्या हॉटेलची तोडफोड