मुंबई - राज्य विधिमंडळाचे दोन दिवसांचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून (१४ डिसेंब) सुरू होत आहे. या अधिवेशनात प्रामुख्याने पुरवण्या मागण्या, शक्ती हा नवीन कायदा आणि त्यासोबत वीजेच्या संदर्भातील सरकारने आणलेल्या धोरणावर आणि कृषीविषयक सुधारणा अशी महत्वाची विधेयक मंजूर केली जाणार आहे.
नागपूर ऐवजी हिवाळी अधिवेशन मुंबईत होत असले तरी कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव लक्षात घेता हे अधिवेशन केवळ दोनच दिवस चालणार आहे. या दोन दिवसांमध्ये सरकारकडून विधेयके, पुरवण्या मागण्या यावर अधिक भर असणार आहे. नेहमीप्रमाणे अधिवेशात चालणाऱ्या तारांकित प्रश्नाचा तास आणि इतर अनेक कामकाजही होणार नाही. तर केवळ तारांकित प्रश्न टेबल केले जाणार आहेत.
शक्ती कायद्यावरील चर्चा ठरणार महत्त्वाची-
काही महत्त्वाच्या लक्षवेधी दुसऱ्या दिवशी घेण्याचे नियोजन आहे. असे असले तरी पुरवण्या मागण्यावरील चर्चा आणि विनियोजन विधेयकांचा वेळ लक्षात घेऊन त्यावरही चर्चा होण्याची शक्यता कमी आहे. विशेष म्हणजे या अधिवेशनात शक्तीसारख्या महिलांच्या सुरक्षेसाठी नवीन कायदा आणि त्यासंदर्भातील इतर एक विधेयक संमत केला जाणार आहे. त्यावरील चर्चा महत्त्वाची ठरणार आहे. त्याचप्रमाणे कृषी सुधारणा विधेयक, सौर वीजेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यासोबत सर्व सरकारी निमसरकारी कार्यालयांवर सौरऊर्जा लावण्यासाठीचे धोरण निश्चित करण्यात येणार आहे. या धोरणाचे कायद्यात रुपांतर केले जाणार आहे.
मराठा आरक्षणावरही होणार चर्चा
सर्वोच्च न्यायालात मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला स्थगिती असल्याने त्यावरही विशेष चर्चा होणार आहे. यात विद्यार्थ्यांच्या प्रवेशासोबत पदभरती, पदोन्नती आदी विषयावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये समन्वय साधला जाण्याची शक्यता आहे. त्यासोबत शिक्षण विभागाने नुकतेच शाळांतील शिपाई आदी पदे रद्द केल्याने त्यावर शिक्षक आणि पदवीधर आमदार आक्रमक होण्याची शक्यता आहे.
नागपूर कराराचे पहिल्यांदाच उल्लंघन
महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर झालेल्या नागपूर करारानुसार राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे घेणे आवश्यक आहे. यंदा मुंबईत होणाऱ्या हिवाळी अधिशेनामुळे नागपूर कराराचे उल्लंघन झाले आहे. तर दुसरीकडे मागील फडणवीस सरकारच्या काळात मनोरा आमदार निवासाच्या पुर्नबांधणीपासून अनेक अडचणी असल्याने पावसाळी अधिवेशन हे नागपुरात आणि हिवाळी अधिवेशन हे मुंबईत घेण्यात आले होते.
विरोधकांची दोन दिवसांत पंचाईत-
सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात विरोधकांच्या हातात अनेक विषय आहेत. असे असले तरी दोन दिवसच चालणाऱ्या अधिवेशनामुळे विरोधकांची पंचाईत होणार आहे. त्यातच कोरोना, कायदा सुव्यवस्था, मराठा आरक्षणानंतर निर्माण झालेली परिस्थिती, मुंबईतील मेट्रो कारशेडचा प्रश्न, शेतकऱ्यांना मदत, अर्णव गोसावींची अटक आदी विषयांवर विरोधक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.