मुंबई - एकीकडे काँग्रेस सारख्या मित्र पक्षाने नांगी टाकलेली असताना, पवारांनी मात्र सर्व विरोधकांना आपल्या अंगावर घेतले. राज्यातील अन् केंद्रातील नेत्यांची फौज एकामागून एक पक्षावर आणि पवारांवर वार करत होते. मात्र पवारही आपल्या भात्यातून एक एक ठेवणीचे अस्त्र काढून प्रत्येक वार यशस्वीपणे परतून लावत होते. राज्यात सत्ता मिळवण्यात पवार आणि त्यांचा पक्ष यशस्वी झाला नाही. मात्र वाटेवर आलेल्या प्रत्येक आव्हानांचा पवार आणि पर्यायाने पक्षाने यशस्वी सामना केला. त्यामुळे मिळालेले हे अपयश यशाहुनही अधिक मोठे असेच आहे...
हेही वाचा... यावेळीही जनतेची 'राजा'ला साथ नाहीच? मनसेला नाकारण्याची ही ५ आहेत कारणे...
अनेक सभांना पवारांचे 'एकाच' सभेतून प्रत्युत्तर
भाजपच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात एकूण ९ सभा घेतल्या, तर अमित शहा यांनी २१ सभा आणि १ ठिकाणी रोड शो केला. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ४८ सभा, ३ रोड शो व १ माँर्निंग वॉक केला. त्या पाठोपाठ उद्धव ठाकरे यांनी सुद्धा ४८ सभा विविध मतदारसंघात घेतल्याचे पाहायला मिळाले. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ एकूण ४६ सभा घेतल्या. तर एमआयचे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांनी २५ ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. त्याचप्रमाणे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सुद्धा आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ २० सभा घेतल्या. मात्र या सगळ्यांवर शरद पवार यांच्या एकूण 60 सभा आणि साताऱ्यातील सभा वरचढ ठरली.
पक्षीय आव्हानांचा यशस्वी सामना
निवडणूक सुरू होण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांनी पक्षाला सोडचिट्टी दिली. राष्ट्रवादीच्या तत्कालीन 40 विद्यमान आमदारांपैकी 25 आमदारांनी पक्षाला राम राम केला. यातील अनेक आमदार सरळ सत्ताधारी पक्षात गेले. या सर्व गयारामांना धडा शिकवण्यासाठी पवारांनी कंबर कसली. एकीकडे गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार दिले. तर वेळे प्रसंगी शिवसेना भाजप यांच्यातीलच काही बंडखोरांना पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली. या निवडणुकीत पवारांनी पक्षाला कोणत्याही प्रकारची नेतृत्वाची उणीव जाणवून न देण्यासाठी अजित पवार, जयंत पाटील या बिनिच्या नेत्यांनाही 'फ्री हँड' दिला.
हेही वाचा... शहरी मतदारांनी 'सेना-भाजप'ला तारले?
'ईडी'चं केलं सोनं
पवारांवर बंधने घातली पाहिजेत यावर भाजपमध्ये वरिष्ठ पातळीवर एकमत होत होते. त्यातूनच राज्य सहकारी बँकेचे प्रकरण समोर आले आणि पवारांवर ईडीचा गुन्हा दाखल झाला. मुरलेल्या पवारांनी आपत्तीला इष्टापत्तीत परावर्तीत केले. गुन्हा दाखल होताच त्यांनी स्वत: ईडीच्या कार्यालयात जाण्याची भूमिका जाहीर केली. आपण तिकडे जाऊ; पण कोणीही ईडीच्या कार्यालयाकडे येऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. या आवाहनाचा अर्थ त्यांच्या कार्यकर्त्यांनी जो घ्यायचा तो घेतला. राज्यभरातून तरुणांचे जथ्थेच्या जथ्थे मुंबईच्या दिशेने निघाले व निवडणुकीच्या हवापालटाची सुरुवात झाली. खऱ्या अर्थाने या कारवाईला पवारांनीच पुढे प्रचारात मुद्दा म्हणून वापर केला.
प्रचारादरम्यान शेतकरी आणि तरूणांचे मुद्दे आग्रहाने मांडले
एकीकडे भाजप प्रचारात कलम 370, राष्ट्रवाद, काश्मीर, पाकिस्तान असे भावनिक मुद्दे मांडत असताना, पवारांनी मात्र अगदी विचारपूर्व मुद्द्यांना हात घातला. आपल्या प्रत्येक भाषणात त्यांनी सातत्याने शेतकरी, कामगार आणि तरूणांचे प्रश्न अन् समस्या मांडले. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देणे सुरूच होते. ‘मेगाभरती’ असे त्याला नाव दिले गेले. सुशिक्षित बेरोजगारांची मेगाभरती असते हे माहिती होते; पण राजकारण्यांची मेगाभरती पहिल्यांदाच पाहतो आहे, असे पवार मध्येच एका सभेत बोलून गेले. त्या एका घटनेने तरुणांना आणखी चेतवण्याचे काम केले. दिसत नसले तरी या सगळ्या घटनाक्रमाचे परिणाम जनतेवर होत होते. पवारांना एकटे पाडले जात आहे, रडीचा डाव खेळला जात आहे, या भावनेने तरुणांच्या मनात घर करणे सुरू झाले होते.
पवारांवर या वयातही होणारे वैयक्तिक हल्ले पाहून मतदारही विचार करण्यास प्रवृत्त
यशवंतराव चव्हाण यांच्या नंतर शरद पवार हे एकमेव नेते राज्यातील कानाकोपऱ्यात स्वतः गेलेले आहेत. ग्रामीण महाराष्ट्रात गेली ५० वर्षे त्यांना ओळखणाऱ्यांना पवारांवर होणाऱ्या वैयक्तिक टीका आणि कारवाईच्या घटनेची चीड आल्याचे दिसत होते. या सगळ्या घटनाक्रमामुळे पवार यांच्याविषयी सहानुभूती निर्माण होत होती. जे शरद पवार कोणत्याही सहकारी बँकेचे संचालकच नाहीत, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होत असेल तर छोट्यामोठ्या चुका व्यवहारात होत असतात, त्यावरून आपले काय होईल, या भीतीने छोट्या व मध्यमवर्गाच्या मनात घर करणे सुरू केले. यात भर पडली ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याची. विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांचे राजकारण संपलेले दिसेल असे विधान त्यांनी केले. भाजपचा हा अतिआत्मविश्वासही लोकांना पटला नाही.
हेही वाचा... विधानसभा निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांची आजवरची कामगिरी..
पवारांच्या वैयक्तिक कार्य आणि प्रयत्नाचा करिष्मा
अनेक जवळचे सगेसोयरे, साथीदार सोडून गेले असताना, निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या विजयापेक्षा पराभवाचेच भाकित केले जात असताना एक ऐंशी वर्षांची चिरतरुण व्यक्ती शरीरातील असंख्य दुखणी सहन करून विरोधकांना आव्हान देतोय. न थकता पायाला भिंगरी लावल्यासारखा अख्खा महाराष्ट्र पिंजून काढतोय. भर पावसात प्रकृतीची तमा न बाळगता सभा घेतोय, ही बाब सर्वसामान्यांना भावली.
विधानसभेचे निकाल आता निश्चित झाले आहेत. काँग्रेस-‘राष्ट्रवादी’ला मतदारांनी सत्ता दिली नसली, तरी एक खंबीर विरोधी आघाडी म्हणून मात्र निश्चितच उभे केले आहे. सुदृढ लोकशाहीसाठी खंबीर विरोधी पक्ष आवश्यकच असतो. त्यामुळेच, आता पुढची पाच वर्षे या विरोधी अंकुशाखालीच युतीला राज्य करावे लागणार आहे, यात शंका नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस ने ही निवडणूक फक्त शरद पवार यांच्या ‘करिष्म्या’वरच लढवली यात शंका नाही. सत्ताधाऱ्यांविरोधात केलेल्या धडाकेबाज प्रचारामुळे आणि आलेल्या निकालातून अखेरीस यंदाच्या विधानसभा निवडणूकीत शरद पवार हेच राज्यातील बडे नेते असल्याचे चित्र दिसू लागले आहे.