मुंबई - राज्यातील दूध संघांची शिखर संस्था असलेल्या महानंद डेअरीच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्यातील सत्ताबदलानंतर आपल्याविरोधात अविश्वास ठराव आणला जाऊ शकतो, या भीतीने त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा... 'बाळासाहेबांच्या स्मारकासाठी झाड तोडणार नाही तर लावणार'
मंदाकिनी खडसे यांनी राजीनामा दिल्याने पुढील चौदा दिवसात नव्या अध्यक्षांची निवड करावी लागणार आहे. अर्थात तो महाविकास आघाडीचा असेल, हे आताच पुरते स्पष्ट झाले आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्तास्थाने असलेल्या सहकारी संस्थांमध्ये धोरणात्मक बदलाच्या माध्यमातून ताबा घेण्याचा प्रयत्न सुरू झाला असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा... अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन: संत गोरा कुंभारांचा देखावा
महानंद डेअरीचे राज्यात सुमारे 87 जिल्हा आणि तालुका सहकारी दूध संघ सभासद आहेत. ते आपल्यामधून 21 जणांची संचालक म्हणून निवड करतात. 2015 मध्ये झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला बहुमत असतानाही तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची पत्नी व डेअरीच्या संचालक मंदाकिनी खडसे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यामुळे तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी या कामी मोठी कामगिरी बजावल्याचे त्यावेळी सांगितले जात होते.
हेही वाचा... निर्भया प्रकरण: 'जर मला फाशी झाली तर माझं कुटुंब उद्ध्वस्त होईल'
राज्यात मात्र आता महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर खडसे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली संचालकांकडून सुरू झाल्या होत्या. तत्पूर्वीच मंदाकिनी खडसे यांनी आपल्या पदाचा राजीनामा व्यवस्थापकीय संचालकांकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे राज्यातील सत्ताबदलानंतर आता महानंदमध्येही सत्ताबदल होणार, हे आता निश्चित झाले आहे. एकंदरीतच सहकारी संस्थांमधील धोरणात्मक बदल बाजार समितीच्या निवडणुकीचा बदललेला पॅटर्न तज्ञ संचालकांच्या हकालपट्टी या निर्णयाच्या माध्यमातून महा विकासआघाडी पुन्हा एकदा सहकारी संस्थांचा वरचष्मा कायम ठेवणार हे आता स्पष्ट झाले आहे.
निवडणूक प्राधिकरणाकडे राजीनामा
मंदाकिनी खडसे यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पुढील चौदा दिवसांत नव्या अध्यक्षांच्या निवडीसाठी निवडणूक घ्यावी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर डेअरीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी सदर राजीनामा सहकार खात्याच्या निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष जगदीश पाटील यांच्याकडे पाठवला आहे, असे महानंदाचे व्यवस्थापकीय संचालक शिवाजी पहनकर यांनी ईटीवी भारतशी बोलताना सांगितले.