मुंबई - लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांवर झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. केवळ बंद न करता महाविकास आघाडी सरकारने प्रथम केंद्राच्या भांडवलदारांचे काळे कायदे, बिले आणि विधानसभेत मांडलेला शेती विषयक ठराव तत्काळ मागे घ्यावा, असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश रेड्डी यांनी केले आहे. जोपर्यंत केंद्र शासन भांडवलदारांच्या हिताचे कायदे मागे घेत नाही, तोपर्यंत संवेदनशील मार्गाने ही लढाई सुरू राहील, असा इशाराही रेड्डी यांनी दिला.
हेही वाचा - Maharashtra Bandh : शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्यांना हा ढोंगीपणाच वाटणार, नाना पटोलेंचा फडणवीसांवर पलटवार
शेतीविषयक ठराव मागे घ्या
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शेतकर्यांच्या अंगावर गाडी घातल्याची अमानुष घटना घडली. केंद्र शासनाने त्यावर कारवाई न करता शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकारच्या या अत्याचाराविरोधात जनतेला जागे करण्यासाठी महाराष्ट्रात बंद करण्यात आला आहे. बंद प्रक्रियेत आम्ही शांततापूर्ण लोकांना आवाहन करत आहोत. आज मुंबईसह महाराष्ट्रात कडकडीत बंद झालेला आहे. लखीमपूरमध्ये उन्मत भाजप नेत्याच्या मुलाचा शेतकर्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रकार घृणास्पद आहे. त्याची निंदा केली पाहिजे. बाबू गेनू यांच्यावरती ब्रिटिशांनी अशाच प्रकारे ट्रक घातला होता. ही त्याची पुनरावृत्ती असून जालियनवाला बाग घटनेची आठवण करून देणारा क्षण आहे. या संबंध प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी बंद पाळला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनीही बंदमध्ये सहभाग घेतला आहे. आमचे त्यांना आवाहन आहे, केंद्र शासनाने जे काळे कायदे केले आहेत, तत्काळ रद्द करावेत. यासाठी विधानसभेत ठराव मंजूर करायला हवा. तसेच विधानसभेत शेतीविषयक मांडलेला ठरावही मागे घ्यावा, अशी मागणी प्रकाश रेड्डी यांनी केली.
संघर्ष आणि दडपणाला बळी पडू नका
दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे नऊ महिन्यांपासून शांततेत आंदोलन सुरू आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, डावे आणि कामगार संघटना सहभागी झालेल्या आहेत. मुंबईत देखील कोणीही जबरदस्ती न करता बंद पाळण्यात येत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि अत्यावश्यक सेवा वगळता, दुकाने, व्यापारी, उद्योग धंदे बंद आहेत. राज्यात बंद यशस्वी झालेला आहे. मोदी सरकारचे शेतकरीविरोधी धोरण, खासगीकरण, शिक्षणासंदर्भातील खासगीकरण, सांस्कृतिक दहशतवाद विरोधात राज्यभरात प्रक्षोभ उभारला आहे. त्यामुळे, आता आघाडी सरकारने भाजपचे धोरण बदलले पाहिजे, यासाठी संघर्ष आणि दडपण कितीही आला तरी बळी पडू नका, लढा सुरूच ठेवा, असेही रेड्डी म्हणाले.
सनदशीर मार्गाने आंदोलन सुरूच राहील
डाव्या पक्षांनी नऊ महिन्यांपासून राज्यभरात शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला असून तो सर्व सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम करत आहे. शेतकऱ्यांवरती ज्याप्रमाणे क्रूरतेने कारवाई करण्यात आली. याबाबत जनमाणसात जनजागृती करत आहोत. केंद्र सरकारची दडपशाही लोकांपर्यंत पोहोचली असून आज जो कडकडीत बंद पाळण्यात आला, हा त्याचाच परिपाक आहे. परंतु, भाजपनेत्यांकडून बंद विरोधी वातावरण तयार करण्याचे काम सुरू आहे. लोकांनी आता सत्य परिस्थिती ओळखली असून आज बंद पाळला आहे. मनसेच्या बंद विरोधी विधानावरही रेड्डी यांनी हल्ला चढवला. नऊ महिने, शांततापूर्ण आंदोलन केले. केंद्र सरकार तरीही संवेदनशील झालेले नाही. लखीमपुरमध्ये गाडी घालण्याचा प्रकार झाला, तो निंदनीय आहे. आम्ही सनदशीर मार्गानेच आंदोलन करत असून यापुढेही ते सुरू राहील, असा इशारा रेड्डी यांनी दिला.
केंद्र सरकारने संसदेत शेतकरी विरोधी अंबानी - अदाणीचा कायदा पास केला. राजकीय भांडवलदारांसाठी शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. जोपर्यंत केंद्र शासन तीन काळे कायदे, बिलही रद्द करत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. कार्पोरेट क्षेत्राविरोधातील ही लढाई आता देशभरात सुरू राहणार असल्याचे रेड्डी यांनी सांगितले.
हेही वाचा - आघाडी सरकारने 'बेस्ट'ला नुकसान भरपाई द्यावी - भाजपची मागणी