मुंबई - मायकल जॅक्सनच्या पॉप शोसाठीचा करमणूक कर माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. विझक्राफ्ट एंटरटेनमेंट एजन्सीला या करमणूक शुल्काची रक्कम परत करण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाने 13 एप्रिल 2011 रोजी या संदर्भात आदेश दिला होता. त्या अनुषंगाने महाराष्ट्र करमणूक शुल्क अधिनियमातील कलम 6 (3) मधील तरतुदींनुसार कोणत्याही करमणुकीच्या कार्यक्रमास करमणूक शुल्काच्या आकारणीतून सूट देण्याचा अधिकार शासनास आहे.
मे. विझक्राफ्ट एंटरटेनमेंट एजन्सी प्रा.लि., मुंबई या संस्थेद्वारे मुंबई येथे दि. 1 नोव्हेंबर, 1996 रोजी आयोजित केलेल्या मायकल जॅक्सन या पाश्चात्य संगीतकाराच्या "पॉप शो" या सदरातील पाश्चात्य संगीताच्या कार्यक्रमास फेरविचारांती करमणूक शुल्क व अधिभार आकारणीतून सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
ट्रॉपिकल मेडिसीन व हेल्थचा अभ्यासक्रमात समावेश-
राज्यातील रुग्णालयांमध्ये ट्रॉपिकल मेडिसीन व हेल्थ या तसेच डी. ऑर्थो या अभ्यासक्रमाचा समावेश करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आला आहे. कॉलेज ऑफ फिजीशियन आणि सर्जन्स या संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमामध्ये यापूर्वी समाविष्ट केलेल्या “ ट्रॉपिकल मेडिसीन व हेल्थ (Tropical Medicine & Health)” या विषयाचा या पदव्युत्तर पदवीका अभ्यासक्रमात समावेश करण्यास कार्योत्तर मान्यता देण्यात आली व “डी. ऑर्थो (D-Ortho.)” या विषयाचा सदर पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमात नव्याने समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कर्करुग्णालयात खाटा वाढविण्यास मंजुरी-
मंत्रिमंडळाच्या या बैठकीत औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालयात रुग्ण खाटा वाढविण्यास मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालयात रुग्ण खाटा वाढविणे तसेच नव्याने 360 पदे निर्माण करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी 24 कोटी 64 लाख 24 हजार 788 इतका खर्च येईल. या निर्णयामुळे सध्याचे अस्तित्वात असलेल्या 100 खाटांमध्ये 165 खाटा वाढवून 265 खाटांचे रुग्णालय होणार आहे. या रुग्णालयासाठी गट अ ते गट ड ची 316 नियमित पदे आणि 44 बाह्यस्त्रोताने अशी एकूण 360 पदे निर्माण करण्यात येतील. हे रुग्णालय सप्टेंबर 2012 रोजी सुरु करण्यात आले होते. यासाठी केंद्राचा 60 टक्के व राज्याचा 40 टक्के वाटा आहे.