मुंबई - केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनातून आता अनेक शेतकरी संघटनांनी अंग काढून घेतले आहे. आता नेमकं कोण आंदोलन करत आहे याचा शोध घ्यायला हवा, अशी प्रतिक्रिया भाजप प्रवक्ता माधव भंडारी यांनी शेतकरी आंदोलनावर दिली आहे. आज शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात विविध संघटनांचे आंदोलन सुरू आहे. याबाबत विचारले असता ते बोलत होते.
आंदोलनात हिंसा झाल्याने जनतेने पाठिंबा काढून घेतला
प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसेचे गालबोट लागले. यामध्ये अनेक पोलीस जखमी झाले. लाल किल्ल्यावर तिरंग्याचा अपमान करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे अनेक शेतकरी संघटना या आंदोलनामधून बाहेर पडलेल्या आहेत. या हिंसाचाराचा दिल्लीतील स्थानिक जनतेला देखील त्रास झाला, त्यामुळे या आंदोलनाला आता जनाधार उरलेला नाही. महाराष्ट्रात देखील आंदोलन सुरू आहे मात्र त्यात शेतकऱ्यांचा सहभाग नसल्याचे माधव भंडारी यांनी म्हटले आहे.