मुंबई- राज्य सरकारने संपूर्ण राज्यात एक मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर गेट वे ऑफ इंडियावर शुकशुकाट आहे. कोरोनाची दुसरी लाट असताना अत्यावश्यक कारण वगळता नागरिकांना बाहेर फिरण्यास मनाई आहे.
राज्यात कोरोची दुसरी लाट आहे. सातत्याने कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असताना कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनमधील नियमानुसार फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांना मुभा देण्यात आलेली आहे. तसेच पर्यटन स्थळ बंद करण्यात आली आहेत. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया ठिकाणदेखील पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे. दररोज हजारोंच्या संख्येने गेट वे ऑफ इंडियावर पर्यटक येत असतात. आनंदाचे क्षण आपल्या मोबाईलमध्ये कॅमेरामध्ये कैद करत असतात. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे लोक आता घरात राहणे पसंत करू लागले आहेत. गेट वे ऑफ इंडिया येथील स्थितीचा ईटीव्हीच्या प्रतिनिधीने आढावा घेतला आहे.
हेही वाचा-ब्रेक द चेन; 'या' सहा राज्यांतून रेल्वेने येणाऱ्यांना आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक
नव्या नियमावलीनुसार, मुंबईत लोकल रेल्वेतून प्रवासाची मुभा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना असणार आहे. सर्व सरकारी कार्यालयांमध्ये केवळ 15 टक्के कर्मचारी हजर राहू शकणार आहेत. यात केवळ कोरोना नियंत्रणातील अत्यावश्यक सेवेला सूट देण्यात आली आहे. सामान्यांना मेट्रो, मोनो आणि लोकल प्रवास पूर्णतः बंद असणार आहे.
गुरुवारी राज्यात 67 हजार 13 नवे कोरोनाबाधित
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. गुरुवारीच्या आकडेवारीनुसार गेल्या चोवीस तासांत राज्यात 67 हजार 13 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 62 हजार 298 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 568 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंदही झाली आहे. राज्यातील मृत्यूदर सध्या 1.54 टक्के एवढा आहे. राज्याला कोरोनाचा विळखा बसला आहे. राज्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाटयाने वाढत आहे. राज्यात औषध आणि ऑक्सिजनचा तुटवडा आहे. त्यातच वाढणारी रुग्ण संख्या ही चिंतेचा विषय बनली आहे.
हेही वाचा-'ब्रेक द चेन’ : राज्य शासनाकडून 'या' दुकानांना वेळेचे निर्बंध; होम डिलिव्हरीस मुभा