मुंबई - मध्य मुंबईतील कामगार वस्तीत अनेक पिढ्या वागणाऱ्या बीडीडी चाळींचा पुनर्विकास ( Redevelopment of BDD Chaul ) करण्यात येत आहे. चाळीचा पुनर्विकास करताना या चाळींना चाळींचे नामकरण करण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान घोषित केला होता. यासंदर्भात गृह विभागाने आज शासन निर्णय जारी करत चाळींच्या नामकरणावर शिक्कामोर्तब केले आहे.
काय असतील पुनर्विकसित चाळींची नावे? - त्यानुसार वरळी येथील चाळींना दिवंगत बाळासाहेब ठाकरे नगर असे नाव देण्यात आले आहे. ना.म. जोशी मार्ग येथील चाळींना दिवंगत राजीव गांधी नगर तर नायगाव येथील पुनर्विकास होणाऱ्या चाळींना शरद पवार नगर, असे नवीन नाव देण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तीनही घटक पक्षांच्या नेत्यांची नावे पुनर्विकसित होणाऱ्या चाळींना देऊन राजकीय समन्वय साधण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे.
राजकारणासाठी बीडीडीची ओळख पुसली - पालांडे - बीडीडी चाळ ब्रिटिशकालीन आहे. शंभर वर्षांहून अधिक काळ या इमारतींना लोटला आहे. या इमारतींमध्ये मुंबईतील मध्यमवर्गीय कामगारांचे वास्तव्य आहे. या चाळींमध्ये कामगारांच्या अनेक पिढ्या गेल्या या चाळींना संस्कृती आणि सणांचा मोठा वैभवशाली इतिहास आहे. मात्र, सरकारने या चाळींचा पुनर्विकासानंतर राजकीय नेत्यांची नावे देऊन हा इतिहास पुसण्याचे काम केल्याची तीव्र प्रतिक्रिया येथील रहिवासी भगवंत पालांडे यांनी व्यक्त केली आहे. वास्तविक इथे कामगारांची संबंधित कोणतेही नाव देणे सरकारला शक्य होते. मात्र, तसे न करता केवळ राजकारणासाठी या विभागाची ओळख पुसली गेल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
पुनर्विकासात तरी राजकारण बाजूला ठेवा - बीडीडी चाळींचा पुनर्विकास हवा, यासाठी आम्ही सर्व नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करत आहोत. त्यासाठी गेल्या काही वर्षांपासून आमचा संघर्षही सुरू आहे. या चाळींमध्ये आणि लहानाचे मोठे झालो. अनेक सण-उत्सव साजरे केले. चाळींचा पुनर्विकास होतो आहे, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. आमच्या अनेक आठवणी या चाळींची जोडल्या गेल्या आहेत. त्या आठवणींना उजाळा देणारे नाव पुनर्विकसित चाळींना देणे अपेक्षित असताना केवळ राजकारणासाठी राजकीय नेत्यांची नावे दिली जाणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया येथील ज्येष्ठ रहिवासी विनायक साळवी यांनी व्यक्त केली.