मुंबई - शिवसेनेच्या विधीमंडळ पक्षनेतेपदाच्या निवडीसाठी आज शिवसेना भवन येथे आमदारांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव सुचवले, त्यानंतर शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
- युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, गटनेते एकनाथ शिंदे, शिवसेना नेते सुभाष देसाई, दिवाकर रावते आदी नेत्यांचे शिष्टमंडळ आज (गुरुवारी) दुपारी 3.30 वाजता राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांची भेट घेणार आहेत. राज्यातील ओल्या दुष्काळाबद्दल राज्यपालांना माहिती करून देणे आणि या ओल्यादुष्काळग्रस्तांना मदत करावी याबाबत चर्चेसाठी भेट, असल्याचे सांगण्यात येत आहे.
- शिवसेनेच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड, तर सुनील प्रभु विधानसभेतील प्रतोद
- शिवसेना विधीमंडळ पक्षनेतेपदाच्या निवडीसाठी शिवसेना भवनात आमदारांची बैठक सुरू... या बैठकीसाठी उद्धव ठाकरे शिवसेना भवनात दाखल.
- दरम्यान, गटनेतेपद आणि पुढच्या सर्व वाटचालीचा निर्णय शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, तसेच बैठकीनंतर सर्व माहिती दिली जाईल, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
यावेळी बोलताना, शिवसेना ५०-५०च्या फॉर्म्युलावरून मागे हटलेली नाही, तर भाजप यावरून मागे हटले आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार नसेल, तर १०५ आमदारांसह भाजपचाही मुख्यमंत्री होऊ शकत नाही, असेही राऊत म्हणाले.
कोण आहेत एकनाथ शिंदे?
राजकीय कारकीर्द सुरू करण्याआधी ते एक रिक्षाचालक होते. 2004, 2009, 2014 आणि 2019 पासून सलग चारवेळा कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून निवडून येण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. एकनाथ शिंदे सध्याच्या मंत्रीमंडळामध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री आहेत. तसेच त्यांच्याकडेच सार्वजनिक आरोग्य आणि कुटूंब कल्याण खात्याचा प्रभारदेखील सोपविण्यात आला होता. 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणूकीनंतर युती होण्याआधीदेखील त्यांची शिवसेनेकडून विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. मात्र, नंतर भाजप-सेनेची युती झाल्यानंतर 5 डिसेंबर 2014 रोजी त्यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. आणि कॅबिनेट मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. ते ठाण्याचे पालकमंत्री सुद्धा होते.