मुंबई - महाराष्ट्र विधानमंडळ काँग्रेस पक्षाचे विधान परिषद गटनेतेपदी आमदार अमरनाथ राजूरकर (Amarnath Rajurkar), तर मुख्य प्रतोदपदी आमदार अभिजित वंजारी (Abhijit Wanjari) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज सभागृहात ही घोषणा केली.
बाळासाहेब थोरात यांनी केली होती शिफारस -
अमरनाथ राजूरकर, नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार असून, अभिजीत बंजारी, नागपूर पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. विधीमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सदर नियुक्ती संदर्भात शिफारस केली होती. महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्याशी चर्चा केल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सदर निर्णय घेतला आहे. आमदार अमरनाथ राजूरकर व आमदार अभिजीत वंजारी यांच्या नियुक्तीचे दोन्ही सभागृहातील काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी स्वागत केले आहे.