मुंबई - कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात राज्यभरातील शेतकरी आणि कामगार संघटनांनी सहभाग नोंदविला आहे. या महामोर्चातील दिवसभरातील विविध टप्प्यांविषयी शेतकरी नेते कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांनी माहिती दिली आहे.
सकाळी अकराच्या सुमारास आझाद मैदानात सभेला सुरूवात होईल. या सभेला शेतकरी नेते संबोधित करतील. त्यानंतर मुंबईतील कामगार संघटना 1 च्या सुमारास आझाद मैदानात दाखल होतील. याच वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्री येथे दाखल होतील. यावेळी होणाऱ्या मुख्य सभेला शरद पवार संबोधित करतील. त्यानंतर दोन वाजेच्या सुमारास आझाद मैदानातून हा महामोर्चा राजभवनाच्या दिशेने कूच करेल. 26 तारखेलाही आंदोलक शेतकऱ्यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजवंदन केले जाईल. त्यानंतर दुपारच्या सुमारास या महामोर्चाची सांगता होईल असे रेड्डी यांनी सांगितले. 26 तारखेला या महामोर्चाची सांगता जरी झाली, तरी कृषी कायदे रद्द होईपर्यंत हा संघर्ष सुरूच राहिल असेही त्यांनी म्हटले आहे.