मुंबई - वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना आघाडीत येण्यासाठी आम्ही २०० जागा दिल्यानंतरही ते आघाडीत येणार नाहीत, असे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. तसेच यामागे फार मोठे राजकीय गणित असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससोबतचे चर्चेचे दरवाजे बंद झाल्याचे सांगून, आपण त्यांच्यासोबत जाणार नसल्याचे जाहीर केले. यावर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार यांनी आंबेडकर यांच्यावर जोरदार टीका केली. आंबेडकर यांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत येण्यासाठी अजिबात रस नव्हता. यापुढेही ते येतील, असे अजिबात वाटत नाही, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. तसेच आंबेडकरांनी वेळोवेळी अल्टिमेटम देऊन, आघाडी करण्याबद्दल संभ्रमाची भूमिका घेतली असल्याने ते आघाडीत येणार नसल्याचे स्पष्ट झाले होते, असे वडेट्टीवार म्हणाले.
हेही वाचा प्रकाश आंबेडकरांनी शिवसेनेवर बोलण्यापेक्षा ओवैसीवर बोलावे, उध्दव ठाकरेंचा पलटवार
प्रकाश आंबेडकर आघाडीसाठीच्या चर्चेसाठी कधीही पुढे आले नाहीत. आम्ही या क्षणीसुद्धा आंबेडकर यांच्या सोबत चर्चा करायला तयार आहोत, असे वडेट्टीवार म्हणाले. तसेच यामधून राज्यात धर्मनिरपेक्ष मतांची मोट बांधून शाहु-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचे सरकार येण्यासाठी आमचे प्रयत्न कायम चालू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा काँग्रेससोबत आघाडी नाही; वंचित स्वतंत्र लढणार, प्रकाश आंबेडकरांचा निर्णय
परंतु, प्रकाश आंबेडकर यांची भूमिका कधीही स्पष्ट राहिलेली नाही. ते नेहमीच वेळ मारून नेण्यात व टाईमपास करण्यात मग्न राहिल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.