मुंबई - देशभरात मोठ्या प्रमाणात शेतकरी आंदोलनं सुरू आहेत. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. यासाठी उद्या (8 डिसेंबर) रोजी भारत बंद पुकारण्यात आला आहे. याला समर्थन देणाऱ्या राजकीय पक्षांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. हा कायदा पास करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे, असे ते म्हणाले.
जे कायदे केंद्रात आता पारित झाले आहेत, ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात करण्यात आले होते. त्यामुळे विरोध करणाऱ्याचं आश्चर्य वाटतंय, असे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात या गोष्टी अगोदर झाल्या. मात्र आता केंद्राने केल्यानंतर विरोध होत आहे. त्यामुळे यातून विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांची दुटप्पी भूमिका दिसून येत आहे, असे ते म्हणाले.
2019 साली काँग्रेसच्या जाहिरनाम्यात अनेक गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. पवार साहेब केंद्रात मंत्री असताना टास्क फोर्स तयार करून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून बाजारपेठेत कायदा लागू करण्याची विनंती त्यांनी केली होती. पवार साहेबांच्या आत्मचरित्रात त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितींबाबत भाष्य केले आहे. एपीएमसी बनली त्यावेळेस चांगला विचार होता. मात्र त्यातून आता पुढे शेतकऱ्यांची लूट होऊ लागली आहे, असे या पुस्तकात आहे. शेती क्षेत्राचा संपूर्ण विकास करायचा असेल, तर 'मॉरल एपीएमसी' कायदा लागू करायला पाहिजे, असे या पत्रात सुचवण्यात आले होते. एपीएमसी आणि मंडई हे दलालांचा अड्डा असतो, असे म्हणणारे आप आणि अकाली, दल, सपा यांनी देखील 'भारत बंद'ला पाठिंबा दिलाय. पण त्यांची देखील भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप फडणवीसांनी केला.
"बेहेती गंगा मे हात धोना" ही त्यांची भूमिका
शिवसेनेनं आमच्या सोबत असताना या कायद्याला पाठिंबा दिला.मात्र आता विरोध करत आहेत. बेहेती गंगा मे हाथ धोना, अशी भूमिका अनेक पक्षांची आहे. हे कायदे शेतकऱ्यांचा हिताचे व फायद्याचे आहेत. पण त्यांचा यांनी अपप्रचार केला. आता मोदीजींविरोधात काही मुद्दे राहिले नाहीत. म्हणून हे सर्व घडतंय.
दिल्लीतील आंदोलनात तत्त्व नसलेल्या व्यक्ती सामील
दिल्लीत आंदोलन करणारे शेतकरी आहेत. मात्र त्यात तत्त्व नसलेले आणि चर्चा न करणारे लोक जास्त सामील आहेत. देशातील शेतकरी सुज्ञ आहेत. ते या कायद्याचे समर्थन करतील. केंद्रातील सरकार हे महाराष्ट्र सरकारसारखं नाही. ते सचिवांवर चालतं, असे फडणवीस म्हणाले.