मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने केलेला आहे. यावर भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि आज विरोधीपक्ष असलेल्या भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन या सगळ्या संदर्भात निवेदन सादर केले.
'2 दिवसांचे अधिवेशन घेण्याचा निर्णय दुर्दैवी'
शेतकरी, सामान्य नागरिक, विद्यार्थी, विविध समाज बांधवांच्या अनेक प्रश्न ऐरणीवर असताना मराठा आणि ओबीसी आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची मागणी होत असताना केवळ दोन दिवसांचे अधिवेशन घेण्याचा निर्णय हा अतिशय दुर्दैवी आहे. तीन पक्षाच्या भानगडीत जनतेला खड्ड्यात टाकण्याचे काम सरकार करत आहे, अशी टीका यावेळी राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
'रस्त्यावर उतरून प्रश्नांना वाचा फोडू'
महाविकासआघाडी सरकारने लोकशाही गुंडाळून ठेवण्याची नवीन पद्धत स्वीकारली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसंदर्भात सुद्धा मागणी केली होती. संविधानाने केलेले नियम पाळायचे नाही अशी सरकारची भूमिका आहे. सामान्य जनतेचे प्रश्न निर्माण होतच राहणार. सरकार अधिवेशन होऊ देणार नसेल तर आम्ही रस्त्यावर उतरून प्रश्नांना वाचा फोडू, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
'महाविकासआघाडीतील अनेक आमदार नाराज?'
महाविकासआघाडी सरकारमधील अस्थिरतेसंदर्भातील प्रश्नांवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिवसेनेतल्या आणि राष्ट्रवादीमधील अनेक आमदारांना खासगीत भेटा त्यावेळेस तुम्हाला समजेल की, हे आमदार किती नाराज आहेत, अशी प्रतिक्रिया यावेळेस माध्यमांना देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
'..नाहीतर आम्ही उग्र आंदोलन करू'
राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपले आहे. एका बाजूला सरकारमधील मंत्री म्हणतात हे आरक्षण पुनर्प्रस्थापित होत नाही तोवर निवडणुका होणार नाही आणि दुसऱ्या दिवशी निवडणुका जाहीर होतात अशा प्रकारे ओबीसी समाजाचा विश्वास घात बंद करा नाहीतर आम्ही उग्र आंदोलन करू, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना दिलेला आहे.
हेही वाचा - संप मिटला : आशा स्वयंसेविकांना 1 जुलैपासून 1500 रुपयांची वाढ, आरोग्यमंत्र्यांकडून घोषणा