मुंबई - कोरोना रुग्णांची संख्या राज्यात वाढताना दिसत आहे. कोरोनाचा पूर्ण प्रादुर्भाव जर कमी करायचा असेल तर लसीकरण हाच एक मार्गसध्या दिसत आहे. यामुळे जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. त्याच लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी देशातील पहिल्या 'ड्राइव्ह इन' लसीकरण केंद्राचे लोकार्पण खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले. या लसीकरण केंद्रावर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना त्यांच्या कारमध्येच लस देण्यात येणार आहे.
दादरच्या कोहिनूर स्क्वेअर टॉवरच्या पार्किंग लॉटमध्ये देशातील पहिल्या ड्राइव्ह इन लसीकरण केंद्राचे लोकार्पण खासदार राहुल शेवाळे यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी आमदार सदा सरवणकर, मुंबई महानगरपालिकेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत, सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
देशातील पहिला प्रयोग -
हा पहिलाच प्रयोग देशात राबविण्यात आला आहे. या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ज्येष्ठ नागरिकांना रांगेत खूप अडचण निर्माण होतात. मात्र, या प्रयोगामुळे त्यांना काही प्रमाणात आराम मिळणार आहे. लसीकरण मोहिमेदरम्यान अडचणींचा सामना करावा लागू नये या उद्देशानं हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
लोकार्पणा आधीच लसीकरण -
खासदार राहुल शेवाळेंच्या हस्ते या लसीकरण केंद्राचे उद्घाटन होणार होते. मात्र, नागरिकांच्या वाहनांची रिघ पाहता येथे लसी देण्यास सुरुवात करण्यात आली. मागील तीन दिवसांपासून मुंबईत लसींच्या तुटवड्यामुळे 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे.
जास्तीत जास्त ३० मिनिट थांबावे लागणार -
कोहिनूरमध्ये दररोज ५ हजार व्यक्तींच्या लसीकरणाची व्यवस्था होऊ शकते. जवळपास २०० कारचालक इथे ड्राइव्ह इन लसीकरणासाठी येऊ शकतात. या ड्राइव्ह इन लसीकणासाठी नागरिकांना जास्तीत जास्त ३० मिनिट थांबावे लागेल. जे नागरीक या सुविधेचा लाभ घेणार, त्यांना फक्त पार्किंगचे चार्जेस द्यावे लागणार आहेत.
शिवसेनेकडून वाहनांची व्यवस्था -
ज्यांच्याकडे वाहन नाही आहे, त्यांच्यासाठी देखील ही सुविधा आहे. शिवसेनेच्यावतीने वाहनांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते स्वतः नागरिकांच्या घरी जाऊन त्यांना लसीकरण केंद्रावर घेऊन जाणार व तसेच घरीदेखील सोडणार आहेत. यामुळे फक्त गाड्या असणार्यांसाठी ही मोहीम नसून ही सर्वांसाठी आहे, असे शेवाळे यांनी सांगितले.