मुंबई - पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटने अमली पदार्थांच्या बाबतीत मोठी कारवाई केली आहे. शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बैगणवाडी परिसरातून २०५३ कोडिन फॉस्फेट या नशेसाठी विकल्या जात असलेल्या औषधांच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ही औषधं कुठल्याही उपचारासाठी वापरात नव्हती, तर परिसरात असलेल्या अल्पवयीन व्यसनी मुलांना विकण्यासाठी या औषधांचा साठा करण्यात आला होता.
कोडिन फॉस्फेटवर राज्यात आहे बंदी
मानवी शरीरास घातक असलेल्या कोडिन फॉस्फेट हे औषध राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधीत आहे. शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत छुप्या मार्गाने याची तिप्पट किमतीत विक्री केली जात आहे. गोवंडीत अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात याची विक्री सुरू असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटला मिळाली होती.
बैगनवाडी परिसरात एका घरात त्यांना हा कोडिन फॉस्फेटचा साठा आढळून आला. पोलिसांनी तो ताब्यात घेतला असून, त्याची किंमत ४ लाख 11 हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी पोलिसांनी राहुल श्रावण गायकवाड (26) या आरोपीला अटक केली आहे.