कोल्हापूर - कोल्हापुरातल्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील आय प्लॅनेट या मोबाईलच्या दुकानात चार दिवसांपूर्वी मोठी चोरी झाली होती. यामध्ये चोरट्यांनी एक दोन नव्हे तर दुकानातील 60 ते 70 आयफोनची चोरी करत अख्ख दुकानच साफ केले होते. याचा पोलिसांनी एका आठवड्यात छडा लावला असून 57 महागडे आयफोन मोबाईल, 3 बॅटरी, 20 चार्जर, सीसीटीव्ही डिव्हीआर सह 11 लाख 65 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांकडून हस्तगत केला आहे. दरम्यान, तीन आरोपींना कर्नाटकातील बेळगाव येथून अटक करण्यात आली ( Kolhapur police arrested 3 Mobile theft ) असून अधिक तपास सुरू आहे.
अख्खे दुकान आणि सीसीटीव्ही डिव्हीआर सुद्धा केले होते लंपास - दरम्यान, मध्यवर्ती बसस्थानक परिसरात असलेल्या जेमस्टोन इमारतीमधील निखिल नांगावकर यांचे आय प्लॅनेट दुकानात यापूर्वी मोठी चोरी झाली होती. चोरट्यांनी शोरूमचे कुलूप तोडून त्यातील अनेक मोबाईल लंपास केले होते. लाखो रुपयांचे हे आयफोन होते. त्यावेळी चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले होते. मात्र 15 जुलै रोजी पुन्हा याच दुकानाच्या पाठीमागे असणाऱ्या खिडकीतून प्रवेश करत 60 ते 70 सेकंड हॅन्ड, नवीन आयफोनची चोरट्यांनी चोरी केली होती. लाखो रुपये किंमतीचे हे मोबाईल होते असा शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मुद्देमालासह तिघांना अटक - विशेष म्हणजे चोरट्यांनी मोबाईल तर लंपास केलेच होते शिवाय दुकानातील सीसीटीव्हीचे सर्किट डिव्हीआर, महत्वाचे बिलबुक तसेच इतर साहित्यसुद्धा लंपास केले होते. पोलिसांनी एका आठवड्याच्या आतच ही मोठी चोरी उघडकीस आणली असून तिघांना मुद्देमालासह अटक केली आहे. सुरज आनंदा पाटील (वय 18, रा. नागनूरबारबै, ता. चिकोडी, जि. बेळगाव), अमर संजय नाईक ( वय 18, रा. रा. नागनूरबारबै, ता. चिकोडी, जि. बेळगाव), आणि ऋषिकेश गोवर्धन महाजन (वय 18, रा. कोर्णी, ता. चिकोडी, जि. बेळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. बेळगाव येथे सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली.