कोल्हापूर- जिल्ह्यामधील सर्व व्यवसायिकांना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलासा दिला आहे. सोमवारपासून जिल्ह्यातील व्यवसाय सुरू करण्याची ग्वाही राजेश टोपे यांनी व्यापारी संघटनांना दिली आहे. त्याबाबतचा अध्यादेश लवकरच काढू, असे आश्वासन टोपे यांनी दिले असल्याची माहिती कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर कमी आल्याने कोल्हापूर जिल्हा हे चार मधून फेज-3 मध्ये आला असल्याचेही टोपे यांनी सांगितले. त्यामुळे लवकरच कोल्हापुरातील बाजारपेठा खुल्या करण्यासाठी परवानगी देणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.
अध्यादेश काढला जाईल-
आरोग्य मंत्री राजेश टोपे हे कोल्हापूर दौऱ्यावर आले असल्याची समजतात, शुक्रवारी सकाळी व्यापारी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयात टोपे यांची भेट घेतली. टोपे यांनी व्यापाऱ्यांची अडचण व समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर आरोग्य मंत्री टोपे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी दर हा कमी आला आहे. फेज चार मधून तो तीन वर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील व्यापार सोमवारपासून सुरू करण्याचे आदेश मी देणार आहे. त्याचा आदेश लवकरच काढला जाईल, अशी ग्वाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देताच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
व्यापाऱ्यांनी तात्काळ राजेश टोपे यांचे आभार मानले. कोरोनाचे सर्व नियम पाळून आम्ही व्यवसाय सुरू ठेवू अशी ग्वाही व्यापारी संघटनेने टोपे यांना दिली. सोमवारपासून कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापार सुरू करण्याचा आदेश लवकरच निघेल, अशी ग्वाही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यापाऱ्यांना दिली आहे. कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी यांनी याबाबतची माहिती पत्रकारांना दिली.
व्यवहार सुरू करण्याचा दिला होता इशारा
गेल्या वर्षी कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प होता. तर दुसऱ्या लाटेत शंभर दिवस व्यवसाय बंद आहे. त्यामुळे व्यापार्यांसह सोबत कर्मचाऱ्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासन दरबारी न्याय मागत असताना देखील कोणीही दाद दिली नाही. शासनाच्या या भूमिकेमुळे व्यापाऱ्यांवर आत्महत्येची वेळ येत आहे. त्यामुळे आंदोलनाशिवाय पर्याय नाही अशी ठाम भूमिका व्यापारी संघटनेने घेतले होती. उद्यापासून व्यवसाय सुरू करणार आहोत. तुम्ही आर्मी बोलवा किंवा पोलीस बोलवा आम्ही आमच्या मतावर ठाम आहोत, असा इशारा व्यापारी संघटनांनी राज्य सरकारला दिला होता. दरम्यान राजेश टोपे यांनी व्यवसाय सुरू करणार असल्याची माहिती देताच त्यांनी हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.