कोल्हापूर- राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी पार पडलेल्या बैठकीत शहर व जिल्ह्यातील व्यापार सुरू करण्याबाबत कोणताच निर्णय झाला नाही. त्यामुळे कोल्हापुरातील व्यापारी आक्रमक झाले आहेत. शंभर दिवस दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आमच्यावर ही वेळ आली आहे. आता आमची मनस्थिती नाही. आर्मी बोलवा किंवा पोलिसांना पाचारण करा, आम्ही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. उद्यापासून आम्ही व्यापार सुरू करणार, असा इशारा कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिला आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर राज्यात सर्वाधिक आहे, अशा परिस्थिती व्यापाऱ्यांच्या या इशाऱ्यासंदर्भात बातचीत केली आहे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधीने...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मात्र, त्यानंतर ज्या ठिकाणी कोरोनाची लाट ओसरली आहे, त्या ठिकाणच्या बाजारपेठा खुल्या करण्याची परवानगी राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. मात्र, राज्यातील आणखी काही जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आली नसल्याने या ठिकाणच्या बाजारपेठा खुल्या करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यावरून आता कोल्हापुरातील व्यापारी वर्ग आक्रमक झाला आहे.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठपुरावा करू
कोल्हापुरातील व्यापार सुरू करावा या मागणीसाठी राज्य सरकारच्या दरबारी पाठपुरावा केला आहे. अनेक पर्याय राज्य सरकार समोर ठेवले आहेत. मात्र राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र तरीही निर्णय घेतला नाही. याबाबत शुक्रवारी आरोग्य मंत्री राजेश टोपे कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्याकडे व्यापार सुरू करण्याबाबत पाठपुरावा करू, अशी माहिती ललित गांधी यांनी केली.
तर राज्यभर ठिणगी पेटेल
कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापार गेल्या शंभर दिवसांपासून बंद आहे. विविध स्तरावर पाठपुरावा करून देखील मागण्यांची पूर्तता होत नाही. त्यामुळे कोल्हापुरातील व्यापारी आक्रमक झाला आहे. व्यापार नसल्याने आर्थिक संकटात व्यापारी रुजत चालला आहे. आर्थिक स्थिती सोबत मानसिक स्थिती ही खालावत चालली आहे. त्यामुळे व्यापारी आत्महत्या करण्याच्या मनस्थितीकडे जात आहे. व्यापारी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. आंदोलनाशिवाय पर्याय नाही. आता कोल्हापुरातून पडलेली ठीणगी ही राज्यभर पोहोचेल असा इशारा देखील व्यापारी संघटनेने दिला आहे.
कोल्हापूरमध्ये बुधवारी आढळले १३७६ कोरोना रुग्ण-
कोल्हापूरमध्ये बाजारपेठा सुरू करा म्हणून व्यापारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. मात्र, सध्य स्थितीत कोल्हापूरमध्ये कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आली नाही. कोल्हापूरचा कोरोनाबाधित रुग्णवाढीचा दर राज्यात सर्वाधिक आहे. बुधवारी कोल्हापुरात एकूण 1376 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.