मुंबई - मुंबई महापालिकेत ( Brihanmumbai Municipal Corporation ) कोविड काळात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमेया ( BJP Leader Kirit Somaiya ) यांनी मुंबईचे महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांवर केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी द्यावेत, असे आवाहन करत सोमैया म्हणजे तमाशातला गांजाडीया असल्याची टीका महापौर किशोरी पेडणेकर ( Kishori Pednekar Critisized Kirit Somaiya ) यांनी केली आहे.
तमाशातला गांजाडीया -
भाजपा नेते किरीट सोमैया यांनी आज पत्रकार परिषद घेत, मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर जोरदार टीका केली. जाधव यांनी कोविड काळात १५ कोटी रुपये आपल्या आणि कुटूंबियांची खात्यात वळवले. तसेच पालकमंत्री महापौरांच्या कंपनीला काम देत असल्याचा आरोप सोमैया यांनी केला. याबाबत सर्व यंत्रणांकडे तक्रार करणार असल्याचेही सोमैया यांनी सांगितले. यासंदर्भात महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया देताना 'किरीट सोमैया म्हणजे तमाशातला गांजाडीया आहेत. किरीट सोमैया ठेवलेला माणूस असून त्यांना जसे सांगितले जाते, तसे ते बोलतात. त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर सादर करावे, नुसते आरोप करू नयेत' असे महापौरांनी म्हटले.
आमचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न -
आम्ही मुंबईकरांचे काम करत आहोत. पक्षाचे काम करत आहोत. आम्ही चांगले काम करत आहोत म्हणून मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊन आमचे लक्ष विचलित करण्यासाठी हे असे आरोप केले जात आहेत. आम्ही लक्ष विचलित होऊ देणार नाही. यशवंत जाधव यांच्यावर जे आरोप करण्यात आले आहेत, त्याचे आधीच त्यांनी उत्तर दिले आहे. हे सर्व आरोप चुकीचे असल्याचे त्यांनी आधीच म्हटले आहे. यशवंत जाधव सोमैयांच्या आरोपांना उत्तर द्यायला सक्षम आहेत, असे महापौर म्हणाल्या.