मुंबई - शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली होती. यात त्यांनी व्यावसायिक जितेंद्र नवलानी यांच्यावर ईडीची भीती दाखवून अनेक व्यापारी व बांधकाम व्यवसायिकांकडून पैसे उकळण्याचा व खंडणी वसुलीचा आरोप केला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकरणाची चौकशी देखील सुरू झाली. मात्र, आता शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर काही तासातच नवलानी यांना क्लीनचिट मिळाली आहे. याच प्रकरणात सहआरोपी असलेले किरीट सोमैया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत निवासस्थानी बोलत ( Kirit Somaiya On Uddhav Thackeray ) होते.
हेही वाचा - Mumbai High Court: भाजप नेते किरीट सोमय्यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा
ही बोगस तक्रार हे निष्पन्न - यावेळी माध्यमांशी बोलताना भाजप नेते किरीट सोमैया म्हणाले की, "सगळ्यात पहिले उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ईडीची माफी मागितली पाहिजे. फेब्रुवारी महिन्यात संजय राऊत यांनी 15 पानी पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले होते. यात त्यांनी म्हटले होते की, ईडीचे चार ऑफिसर आणि किरीट सोमैया हे नवलानी यांच्यामार्फत इथल्या व्यावसायिकांना धमक्या देतायेत आणि खंडणी वसूल करत आहेत. या प्रकरणाची यादी देखील चौकशी झाली. त्यावेळी यात ही तक्रार बोगस असल्याचे निष्पन्न झाले होते."
पत्रात पुरावे नाहीत - पुढे बोलताना सोमैया म्हणाले की, "संजय राऊत यांनी जे भले मोठे पत्र दिले त्यात कोणतेच पुरावे दिलेले नाहीत. यात पुरावा म्हणून काय तर फक्त बॅलन्स शीट जोडली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचची एसआयटी स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम बनवली आणि याची चौकशी सुरू केली. त्यानंतर ही केस कोर्टात उभी राहिली."
आता तिघांनी माफी मागा - "न्यायालयात जी सुनावणी सुरू झाली त्या सुनावणीत हे स्पष्ट झाले की, तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी खोटे पुरावे उभे करून किरीट सोमैया आणि ईडीला दाबण्यासाठी, आपली दहशत निर्माण करण्यासाठी खोटी तक्रार दाखल केली होती. अखेर काल एसआयटीचा रिपोर्ट आला. त्यांनी जवळपास 67 ते 68 लोकांची चौकशी केली आणि त्यांनी आपला रिपोर्ट सादर केला की यात आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. आता मी उद्धव ठाकरे, संजय पांडे, संजय राऊत यांना नोटीस पाठवणार आहे. त्यांनी माझी, ईडीची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल त्यांना माफी ही मागावीच लागेल." अशी प्रतिक्रिया किरीट सोमैया यांनी दिली आहे.
हेही वाचा - Kiriti Somaiya : शिंदे गटातील भ्रष्टाचारी नेत्यांची नावे घेताच सोमैयांची चुप्पी; राऊत, परबांना इशारा