मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाचे नेते किरीट सोमैया ( BJP leader Kirit Somaiya ) आणि त्यांच्या पत्नीवर शौचालय घोटाळ्याचा ( Toilet scam case ) गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच सोमैयांनी थेट नगरविकास खात्याचे प्रधान सचिव भूषण गगराणी ( Bhushan Gagrani Principal Secretary Urban Development Department ) यांना पत्रव्यवहार करत कोणती कारवाई करण्यापूर्वी आमच्याशी संपर्क करा, असे आवाहन केले आहे. सोमैया यांच्या पत्रामुळे ( Letter from Somaiya ) राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत.
मीरा भाईंदर महापालिका आणि राज्यात शौचालय घोटाळा केल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी करून खळबळ उडवून दिली. खोटी बिल आणि पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याचे कारणे देत कोट्यवधी पैसे उकळले. युवा प्रतिष्ठान नावाच्या संस्थेमार्फत हा घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. सर्व पुरावे असून पालिका आयुक्तांच्या अहवाल माझ्याकडे आहे. आता सोमैयांना अटकपूर्व जामीनसाठी कोर्टात धाव घ्यावी लागेल, असा दावा राऊत यांनी केला होता. हे सर्व आरोप किरीट सोमय्या यांनी फेटाळून लावले होते.
'आमच्याशी संपर्क साधा' : राऊत यांचा सोमैयावर आरोपांचा भडिमार सुरू असतानाच किरीट सोमैयांनी नगर विकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांना पत्र पाठवून राऊत यांनी माझ्यावर केलेले आरोप राजकीय हेतूने केले आहेत. वीस वर्षांपूर्वीचे हे प्रकरण असून आज असा आरोप करणे राजकीय सूडबुद्धी आहे. याचा पुनर्विचार करावा. तसेच काही झाले तरी यासंबंधी कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी माझ्याशी संपर्क करून आम्हाला विचारणा करावी, अशा आशयाचे पत्र प्रधान सचिव गगराणी यांना पाठवले आहे. राजकीय किंवा अन्य दडपणाखाली आमच्या परिवाराविरोधात कृती अधिकारीवर्ग गुन्हा नोंद होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रशासन काय निर्णय घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुन्हा मुख्यमंत्र्यांना इशारा : भाजपा नेते किरीट सोमैया वारंवार महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करत आहेत. नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर बांधकाम घोटाळ्याचा आरोप केला. आदित्य आणि तेजस ठाकरे यांची नाव देखील अन्य प्रकरणात जोडली. शिवसेना आणि सोमैया असा वाद सुरू आहे. आज थेट सोमैयांनी हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करुन दाखवावी, असा इशारा दिला आहे. यापूर्वीही सोमैया यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना आव्हान देण्यात आले आहे. मात्र मुख्यमंत्री काय भूमिका घेतात, हे येत्या काळात स्पष्ट होईल.
हेही वाचा - Sanjay Raut : 'रामनवमीला झालेले हल्ले मोठं षड्यंत्र'