मुंबई - अभिनेत्री कंगना राणौत आणि प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. अभिनेत्री कंगना आणि वाद हे समीकरण आहे. मात्र न्यायालयाने कंगनाला चांगलाच दणका दिला आहे. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात मानहानीचा दावा केला आहे. मात्र एकाही सुनावणीला कंगना न्यायालयात हजर राहिली नाही. यामुळे न्यायालयाने कंगनाच्या या वृत्तीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जर पुढील सुनावणीला कंगना न्यायालयात हजर राहिली नाही तर, तिच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट शब्दात खडसावलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 1 सप्टेंबर रोजी होणार आहे.
काय आहे प्रकरण?
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात कंगना राणौत समाज माध्यमांवर नेहमी व्यक्त होत असते. याच दरम्यान कंगना राणौत हिने एका वृत्तवाहिनीला एक मुलाखत दिली होती. या मुलाखती दरम्यान तीने गीतकार जावेद अख्तर यांच्या विषयी अपमानास्पद शब्द वापरले होते. यामुळे नाराज झालेल्या जावेद अख्तर यांनी कंगना राणौत हिच्या विरोधात मानहानीचा दावा न्यायालयात दाखल केला होता.