मुंबई - कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याला पायबंध घालण्यासाठी राज्य शासनाकडून कोरोनाचे निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. तसेचकोरोना नियमावलीचे पालन करण्यासंदर्भातील गाईडलाईनही जारी करण्यात आली आहे. मात्र कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न केल्याचा फटका एका वकिलाला बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणीच्या वेळेस वकिलाने तोंडावरचा मास्क काढला म्हणून त्यांच्या याचिकेवरील सुनावणी घेण्यास न्यायाधिशांनीच नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर 22 फेब्रुवारीला आलेल्या एका याचिकेवर वकिलांकडून युक्तिवाद केला जात होता. सुनावणीच्या वेळेस कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन केले जावे म्हणून न्यायालयाकडून या अगोदरच वकील व याचिकाकर्त्यांना सुचित करण्यात आले होते. मात्र, सुनावणीच्या दरम्यान पक्ष ठेवणाऱ्या वकिलांकडून त्यांच्या तोंडावरील मास्क काढला. यामुळे न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी संबंधित वकिलाने नियमांचे उल्लंघन केले म्हणून त्यांची याचिका तत्काळ बोर्ड वरून काढून टाकली.
मुंबईत मास्क सक्तीचाच-
कोरोना संक्रमण वाढत असून दिवसेंदिवस आर्थिक राजधानी मुंबई शहरात रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. कोरोना नियमावलीचे पालन करावे म्हणून राज्य शासनाकडून गाईडलाईन जारी करण्यात आल्यानंतरही नागरिकांकडून नियमांचे पालन होत असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेसह मुंबई पोलिसांना मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. आतापर्यंत मुंबई पोलिसांकडून मुंबई शहरातील 34 हजार 882 मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आलेली असून एकूण 68 लाख 96 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे.