मुंबई - महाड येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने संपूर्ण तळये गाव जमिनदोस्त झाले. या गावाचा पुनर्विकास म्हाडामार्फत करणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज ट्विट करून केली. या पुनर्वसन योजनेचे संकल्प चित्रही त्यांनी जाहीर केले.
बेफाम कोसळलेल्या पावसामुळे महाड तालुक्यात माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली. तालुक्यातील तळये गाव क्षणात होत्याचे नव्हते झाले. ३५ कुटुंब जमिनीखाली गाडली गेली आहेत. सुमारे ५२ लोकांचा आणि ३३ जनावरांचा दगावली आहेत. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर म्हाडाने संपूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी स्विकारली आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. जितेंद्र आव्हाड म्हणाले, की मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिला की कोणालाही अडचण भासू देणार नाही. ती पूर्ण करायला ही सुरुवात आहे.
हेही वाचा-आपत्तीग्रस्त भागात सर्वतोपरी मदत, शिवभोजन थाळीमध्ये दुप्पट वाढ केल्याची भुजबळ यांची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेबांनी मला सूचना केली होती, असे सांगत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तळये गावाच्या पूर्णबांधणीची घोषणा केली आहे. त्यासोबतच तळीये गावातील घरे कशा प्रकारची असतील याचे संकल्पचित्रही आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून प्रसिद्ध केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तळीये गावातील स्थानिकांशी बोलताना कोणत्याही प्रकारची मदत कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले होते. तसेच संपुर्ण जबाबदारी ही राज्य सरकारची असेल असेही त्यांनी सांगितले होते.
हेही वाचा-सांगली : वारणा आणि कृष्णा काठच्या अनेक गावात पूरस्थिती; काही गावांचा संपर्कही तुटला
काय म्हणाले होते मुख्यमंत्री?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाड येथील तळये गावाचा शनिवारी दौरा केला. यावेळी त्यांनी पुरग्रस्तांना धीर देण्याचा प्रयत्न केला. 'तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचे पुनर्वसन करू. सर्वांना मदत दिली जाईल', अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये गावातील मृतांच्या नातेवाईकांचे अश्रू पुसले.