मुंबई - राज्य विधानसभेच्या अधिवेशनात दरवर्षी सीमाभागातील प्रश्नांवर चर्चा केली जाते. आजही त्या भागातील जनतेची थट्टा उडवली जाते, अशी खंत शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी विधान परिषदेत व्यक्त केली. राज्यपाल यांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु होती. त्यावेळी पाटील बोलत होते.
किती दिवस न्यायालयात भांडणार -
अभिभाषणात राज्यपाल हे मराठीत बोलले. त्यामुळे महाराष्ट्राला खुमारी आली. मात्र सीमा भागातील मराठी बांधवाना अद्याप आपण न्याय देऊ शकलेलो नाही. बेळगावसह सीमा भाग महाराष्ट्रात आला पाहिजे. यावर फक्त बोलले जाते. पूर्वी अधिवेशनात सुरुवातीला सीमा भाग प्रश्नावर बोलले जात असे. आता तो प्रश्न मागे पडला आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यावर आता सीमा भागातील समस्येवर चर्चा होते. हा प्रश्न सध्या न्याय कक्षेत आहे. साडेतीन तालुक्यांचा हा भाग महाराष्ट्रात आला पाहिजे. यासाठी न्यायालयात किती दिवस भांडणार, असा सवाल पाटील यांनी केला. तसेच दरवर्षी अधिवेशनात चेष्टा होत असल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली.