मुंबई - शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून केंद्र सरकारवर जोरदार टीकास्र सोडण्यात आले आहे. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकारने एक पाऊल मागे घेतले असते तर 'प्रजासत्ताक दिनी' ट्रॅक्टर रॅली काढण्याची वेळ आलीच नसती असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. हे खरेच प्रजासत्ताक आहे का असा सवाल या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.
हे चित्र बरे नाही
केंद्रातील सरकारने एक पाऊल मागे घेतले असते तर आज राजधानीत प्रजासत्ताक दिनाचे संचलन आणि शेतकऱ्यांचा आक्रोश एकाच वेळी दिसला नसता असे या अग्रलेखात म्हटले आहे. नोटाबंदी, जीएसटी आणि लॉकडाऊन यामुळे देशाच्या सर्वसामान्य माणसाच्या मनातही आक्रोश आहेच. रशियासारख्या पोलादी देशातील जनताही तेथील राजवटीच्या विरोधात मॉस्कोच्या रस्त्यावर उतरली. हे समजून घ्यायला हवे. आज आपल्या देशाच्या राजधानीत शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. त्याच्या पाठिंब्यासाठी राज्या राज्यांच्या राजधानीतही शेतकऱ्यांचे धडक मोर्चे निघत आहे. हे चित्र बरे नाही. हा वणवा आणखीही पसरू शकतो असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
हेही वाचा - अरे शेंबड्यांनो, मुळात तुमच्या त्या...शिवसेनेने भाजपाला अग्रलेखातून चांगलेच धुतले