मुंबई/बीड -पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चांगलेच गाजत असून विरोधक आक्रमक झाले आहेत. दरम्यान, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रीया येत आहेत. एका प्रकरणाबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रीया येत असल्यामुळे या प्रकरणाचे राजकारण झालयं का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बंजारा समाजाच्या मोठ्या नेत्याचे नाव या प्रकरणात आल्यामुळे बंजारा समाज देखील एकवटल्याचे चित्र आहेत.
महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून टीकेची झोड-
दरम्यान, या आत्महत्या प्रकरणासंदर्भात नवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणाशी संजय राठोड यांचा थेट संबंध असल्याचा उल्लेख भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे प्रकरणानंतर संजय राठोड यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. बंजारा समाजाचे नेते आणि माजी आमदार हरिभाऊ राठोड म्हणाले, याबाबत काय बोलायचं आपलेच दात आणि आपलेच ओठ आहेत. या सगळ्या प्रकरणाची चौकशी पुणे पोलिसांकडून सुरू आहे आणि या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केल आहे. त्यामुळे मी यावर अधिक भाष्य करणार नाही. माझा संजय राठोड यांच्याशी संपर्क झालेला नाही. जर माझा संपर्क झाला तर मी त्यांना या प्रकरणासंदर्भात विचारणा करेले, अशी माहिती त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितले.
अतुल भातखळकर यांच्यावर गुन्हा दाखल करा, परळी पोलिसात तक्रार दाखल-
पूजा चव्हाण प्रकरणांमध्ये विरोधी पक्षाकडून भूमिका मांडत असलेले अतुल भातखळकर यांच्याविरोधात बंजारा समाजाच्या वतीने तक्रार करण्यात आली आहे. बंजारा समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी तसेच अश्लील व जातिवाचक शब्दाचा वापर करत माध्यमांवर बदनामीकारक माहिती दिल्यामुळे भाजप नेते अतुल भातखळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बंजारा समाजाच्या वतीने परळी या ठिकाणी करण्यात आली. परळी पोलीस स्टेशनमध्ये बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अतुल भातखळकर यांच्या विरुद्ध तक्रार दिलेली आहे.
वाशिममध्ये बंजारा समाजाच्या महंतांची बैठक-
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चांगलेच गाजत असून विरोधक आक्रमक झाले आहेत. मात्र, या संदर्भात बंजारा समाजाचे धर्मगुरू रामराव महाराज यांचे धर्मपिठाधिश्वर बाबूसिंग महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत पोहरादेवी येथे बैठक झाली. यावेळी सर्वच महंतांनी संजय राठोड यांच्यावर जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत या प्रकरणाशी जोडणे योग्य नाही, त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा इथेच थांबवावी, अशी विनंती केली आहे.
पूजा चव्हाण यांनी केलेली आत्महत्या ही दुर्दैवी आहे. पूजाला न्याय मिळाला पाहिजे. मात्र, ऑडिओ क्लिपवर समाजाचे नेते संजय राठोड यांना बदनाम केल्या जात आहे. त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी केल्यानंतर सत्य समोर येईल. देशातील संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी असल्याचे येथील महंतांनी सांगितले.
विरोधकांच्या बोलण्यात तथ्य नाही, चौकशीतून सत्य पुढे येईल - गृहमंत्री
पूजा चव्हाण आत्महत्येमागील सत्य काय आहे ते पोलीस लवकर समोर आणतील. पोलिसांवर कोणाचाही दबाव नाही. तसेच विरोधी पक्षाच्या आरोपात काहीही तथ्य नसल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. ते नागपुरात बोलत होते. पूजा चव्हाण प्रकरणात नियमानुसार रितसर चौकशी होणार आहे. चौकशीतून जे काही समोर येईल त्यानुसार राज्य सरकार पुढे निर्णय घेईल, असेही गृहमंत्री यांनी सांगितले.
नियमानुसार चौकशी होणार असल्याचे याआधीच मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. पुणे पोलीस नियमानुसार चांगले काम करत चौकशी करत आहे. चौकशी पूर्ण झाल्यावर जे काही सत्य आहे ते बाहेर येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.
संजय राठोड यांचं नाव घेणं टाळलं
प्रकरणाची नियमानुसार चौकशी सुरू आहे. चौकशीनंतर सत्य समोर येईल. दरम्यान, संजय राठोड यांची चौकशी होणार का? यावर मात्र गृहमंत्र्यांनी बोलणे टाळले आहे. संजय राठोड कुठे आहेत असे विचारले असता, हा त्यांचा वैयक्तीक प्रश्न असल्याचेही गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. एकदा संपूर्ण चौकशी पूर्ण झाल्यावर राज्य सरकार पुढचा निर्णय घेईल, असेही ते म्हणाले.
'सात दिवसांपासून कॅबिनेट मंत्री कुठे गायब आहेत?
महाविकास आघाडीमधील प्रत्येक कॅबिनेट मंत्र्यांना पोलीस सुरक्षा आहे. तरीही मागील सात दिवसांपासून वनमंत्री गायब आहेत. कॅबिनेट मिटिंगलाही ते गैरहजर राहतात. एका तरुणीच्या मृत्यूप्रकरणी आपल्या मंत्र्यावर आरोप होत आहेत तरीही मुख्यमंत्र्यांनी मौन धरले आहे, ही आश्चर्यजनक बाब आहे. पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात लपवाछपवी सुरू आहेत. महाविकास आघाडीचे सरकार काय करत आहे? असा प्रश्न भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.
पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडीचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर येत आहे. यात तथ्य असेल तर ते माध्यमांसमोर आले पाहिजे. गृहमंत्री अनिल देशमुख तेसुद्धा विदर्भातील आहे. तेही या विषयावर बोलण्यास तयार नाहीत. मुख्यमंत्री देखील गप्प आहेत. त्यामुळे या प्रकरणातील संशय आणखी वाढत असून तथ्य असल्याकारणानेच लपाछपी सुरू असल्याचा, आरोप माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
पूजाची हत्या नाही, तर आत्महत्याच- धनंजय मुंडे
बीडच्या तांड्यावरील त्या तरुणीच्या प्रकारणाची सखोल चौकशी झाल्यावर वक्तव्य करणे योग्य राहील. तिची हत्या की आत्महत्या याबाबत पोलीस तपास सुरू आहे. मात्र तुम्हालापण माहीत आहे, ही आत्महत्या आहे असे वक्तव्य राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. तरुणीच्या मृत्यूबाबत पोलीस तपास सुरू आहे. त्यातून सत्य बाहेर येईल. ज्यांच्यावर आरोप झाले त्या सगळ्या परिस्थितीबाबत पोलीस तपास पूर्ण होऊ द्या. नंतर कोणाचे नाव येईल ते बघू, असे विधान मुंडे यांची पत्रकारांच्या प्रश्नावर दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत उपस्थित राहण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे शहरात आले होते.
एखाद्या माणसाला बदनाम करणे योग्य नाही; चौकशी झाली पाहिजे - मुश्रीफ
एखाद्या माणसाला बदनाम करणे योग्य नाही. कोणत्याही गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. धनंजय मुंडे यांच्याबाबत काय झाले, हे आपल्यालाही माहिती आहे. त्यामुळे चौकशीआधी काहीही टीका करणे अयोग्य असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. सत्ता गेल्यामुळे भाजपला काहीही आरोप करायची सवय लागली आहे. त्यामुळे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. शिवाय यामध्ये राज्य सरकारमधील एका मंत्र्यांचा संबंध असल्याचा भाजपकडून आरोप होऊ लागला आहे. त्यामुळे याबाबत चौकशीच्या आधी असे काहीही आरोप करणे चुकीचे असल्याचे मुश्रीफ म्हणाले.
पोलिसांनी सुमोटो कारवाई करायला पाहिजे- देवेंद्र फडणवीस
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी ज्याप्रकारे कारवाई करायला पाहिजे, ती होताना दिसत नाही, त्यामुळे पोलीस कुठल्या दबावात आहे का, असा प्रश्न निर्माण होतो, अशी प्रतिक्रिया विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच याप्रकरणी पोलिसांनी सुमोटो कारवाई करायला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.
काय आहे प्रकरण -
पुण्यातील हडपसर येथील एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीने उडी घेत आत्महत्या केली. याबाबतची तक्रार वानवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. त्यानंतर तिच्या आत्महत्या प्रकरणाशी कथितरित्या निगडीत असलेल्या काही ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या आहेत. भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी संपूर्ण घडामोडी आणि समोर येणाऱ्या माहितीच्या आधारावर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना जबाबदार धरत कारवाईची मागणी केली. पूजा चव्हाण ही मुळची बीड जिल्ह्यातील परळीची रहिवासी आहे. ती पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लाससाठी गेली होती, अशी माहिती समोर येत आहे.
हेही वाचा- चंद्रकांत दादा हा कसला पुरुषार्थ ? शरद पवारांवर केलेल्या टीकेवर जयंत पाटलांचा घणाघात