मुंबई - राज्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. कित्येक जिल्ह्यामध्ये मोठी जीवित हानीही झाली आहे. अनेकांची घरे यामध्ये उध्वस्त झाली आहेत. तर, कित्येक घरातील लोकांनी आपले कुटुंबच्या कुटुंब गमावले आहेत. या संकटाचा अजून काही लोक सामना करत आहेत. ही परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी आजही मोठ्या प्रमाणात मदत कार्य सुरू आहे. अनेक सामाजिक संघटना, संस्था यामध्ये मदत करत आहेत. मात्र, कोरोना काळात मदत कार्यासाठी प्रसिद्ध झालेला सोनू सूद कुठे गेला? असा सवाल मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, शालिनी यांनी मुंबईत राहून, इथे नाव आणि पैसा कमावून यांची समाजसेवा ही फक्त राज्याबाहेरील लोकांपुरतीच आहे का? असा सवालही आपल्या ट्विटरवरु उपस्थित केला आहे.
'सोनू सूद नावाच्या एका महान 'मसीहा'चा जन्म झाला'
मुसळधार पावसाचा फटका रत्नागिरी, रायगड, सांगली, सातारा, या जिल्ह्याला बसला आहे. या जिल्ह्यांमध्ये मोठी जीवितहानीही झाली आहे. या अडचणीच्या काळात राज्यात सर्व स्तरातून पूरग्रस्तांना मदत होताना दिसत आहे. मात्र बॉलिवूड कलाकार मात्र मदतीसाठी पुढे आल्याचे चित्र फारसे पाहायला मिळत नाही. यावरून मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी बॉलीवूडवर आणि हिंदी सृष्टीतील कलाकारांवर चांगलीच टीका केली आहे. यासंबंधी त्यांनी एक ट्वीटही केले आहे. यामध्ये शालिनी यांनी 'कोरोना काळात सोनू सूद नावाच्या एका महान 'मसीहा'चा जन्म झाला होता, पण कोकणच्या पूरपरिस्थितीत मात्र, हे महात्मे गायब आहेत. मुंबईत राहून, इथे नाव आणि पैसा कमावून यांची समाजसेवा ही फक्त राज्याबाहेरील लोकांपुरतीच आहे का?' असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच, त्यांच्या या ट्विटर पोस्टवर त्यांनी सोनू सूदलाही टॅग केले आहे.
'एक लाख लोकांना नोकऱ्या देण्याची घोषणा'
लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेक तरूण या काळात बेरोजगार झाले. तर, अनेक कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. पण, या सर्वांसाठी अभिनेता सोनू सूद सुपरहिरो ठरला. लॉकडाऊनच्या काळात आणि त्यानंतरही सोनूनं लोकांना मदत करत राहिला. सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या लोकांनी त्याच्याकडे मदत मागितली अशांनाही त्याने मदत केली. एवढेच नाही, तर त्याने ट्विटरवर त्यांना रिप्लायही दिले होते. त्यानंतर आता सोनूने एक लाख लोकांना नोकऱ्या देण्याची घोषणा केली होती. मात्र, पूरग्रस्तांनासाठी सोनू सूद पूढे येत नसल्याने, त्याच्यावर टीका होत आहे.