पुणे - मागील पाच वर्षांत भाजपा सरकारच्या काळात महावितरणचे 67 हजार कोटी रुपये थकले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रावर संकट ओढावल्याची टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. भाजपाने हे मोठे संकट आणले आहे. मात्र महाविकास आघाडी सरकार यातून मार्ग काढेल, असे ते म्हणाले. वीजबिलावर निर्णय घ्यायला सरकारला एवढा वेळ का लागतोय, असा प्रश्न विचारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या काळात थकबाकी कशी वाढली याचा अभ्यास करायला वेळ द्या, असे जयंत पाटील म्हणाले.
ऊर्जा मंत्र्यांची कोंडी होत आहे. तसेच काँग्रेसला डावलले जात असल्याचा अपप्रचार भाजपाकडून केला जातोय. त्याकडे कोणीही गांभीर्याने पाहू नये, असे ते म्हणाले. युती सरकारवेळी भाजपाने शिवसेनेला अशीच वागणूक दिली असेल. मात्र आमचे मुख्यमंत्री कोणताही दुजाभाव करत नसल्याचे पाटील यांनी सांगितले.
जयंत पाटील पुण्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील महा विकासआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी आले आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेस भवनात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची संयुक्त बैठक घेतली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे पदवीधर संकटात
देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाल्यामुळे पदवीधरांसमोर मोठे संकट आहे. पदवीधरावर कोरोनाच्या आधीच केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे संकटात आले. त्यामुळे महाआघाडीचे उमेदवार पदवीधरांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली.
मुंबई महापालिका निवडणूक
ज्यांचा पराभव होणार ते आधीच तयारी करत असतात. त्यांना आम्ही चितपट करणार आहे, असे पाटील म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे आत्ता उठाबशा काढत असले, तरी त्यांना पराभव होणार हे महित असल्याचा टोला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी लगावला.
काय आहे वाढीव वीजबिल प्रकरण?
महावितरण कंपनीने पाठवलेल्या वाढीव वीज बिलांविरोधात मागील आठवड्यापासून वातावरण तापत आहे. अनेक सर्वसामान्य ग्राहक तसेच शेतकऱ्यांना अवाजवी रक्कमेचे लाइटबिल पाठवल्याने त्यामध्ये तडजोड करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या मुद्द्यावर राजकीय पक्षांनी हस्तक्षेप केल्यानं 'लाइटबिल' राजकारणाला सुरुवात झाली आहे.
महाविकास आघाडी सरकारने याबाबत कोणताही निर्णय जाहीर न केल्याने विरोधांच्या हातात आयतं कोलीत मिळालंय. त्यातच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनीही सरकारचा निर्णय पुढे रेटल्याने सर्वसामान्यांमध्ये असंतोष आहे. यामुद्द्यावरून विरोधीपक्षाने सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे. वाढीव वीज बिलांचा मुद्दा मार्गी न लावल्यास सोमवारपासून राज्यभरात आंदोलनाचा इशारा भाजपाने दिला आहे. तसेच आज मुंबई आणि सांगलीत याविरोधात भाजपाने रान पेटवल्याचे पाहायला मिळाले. भाजपा महिला आघाडीने महावितरणच्या प्रकाशगड या कार्यालयावर मोर्चा काढत जोरात घोषणाबाजी केली. यावेळी मुंबई भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.