मुंबई - केईएम रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजी पणामुळे प्रिन्सचा मृत्यू झाला. हे प्रकरण ताजे असतानाच मांजरीने गर्भपात केलेले भ्रूण खाल्ल्याचे उघडकीस आले. मात्र, मांजरीने भ्रूण खाल्ल्याचे सीसीटीव्हीमध्ये निदर्शनास आले नसल्याने हे भ्रूण आले कसे, या प्रकरणी दोषी कोण याबाबत खात्यांतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत.
पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नोव्हेंबरमध्ये प्रिन्स राजभर या 4 महिन्याच्या बाळाचा दुदैवी मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आठवडाभरापूर्वी मांजराने भ्रूण खाल्याची घटना समोर आली. केईएम रुग्णालयाचा कारभार या घटनेनंतर चव्हाट्यावर आला. विविध स्तरांवरुन केईएम रुग्णालयावर टीका झाली. महापालिकेला बदनाम करण्यासाठी समाजकंटकाचे प्रयत्न आहेत, असा संशय केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी व्यक्त केला होता. कचरा वाहून नेणाऱ्या कंत्राटदार दोषी आढळल्यास कठोर कारवाईचे केली जाईल, असा इशारादेखील डॉ. देशमुख यांनी दिला आहे.
दरम्यान, आयुक्तांनी याप्रकरणाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमली. या समितीने बायोमेडिकल वेस्ट कक्ष आणि परिसरातील सीसीटीव्ही तपासले. यात मांजराच्या किंवा कोणत्याही आक्षेपार्ह काहीच सापडले नाही, असे प्राथमिक अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे कंत्राटदाराला क्लीन चिट दिली आहे. मात्र, याप्रकरणी खात्यांतर्गत चौकशी करणार असल्याचे आरोग्य खात्याचे उपायुक्त सुनील धामणे यांनी सांगितले. कर्मचारी-अधिकाऱ्यांकडे धामणे यांनी संशयाची सूई रोखल्याने संबंधित विभागातील सर्वांचे धाबे दणाणले आहेत.
अशी होते प्रक्रिया -
रुग्णालयाच्या ऑर्थोपेडिक विभागाच्या कोपऱ्यात गेट नंबर 7 जवळ जैविक कचरा कक्ष आहे. केईएम रुग्णालयाच्या विविध वॉर्डमधून येणाऱ्या जैविक कचऱ्याच्या पिशव्यांची नोंद केली जाते. वॉर्ड क्रमांक, पिवळी-लाल पिशवी, कॅन अशा प्रकारची नोंद होते. पिवळ्या पिशवीत निकामी झालेले अवयव तर लाल पिशवीत ग्लोज, कॅनमध्ये सुया, इंजेकशन्स अशी वर्गवारी केली जाते. सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत रुग्णालयातून दोन वेळा कचरा विल्हेवाटीसाठी आणला जातो. 2 फेऱ्यांमध्ये एकदा पिवळ्या तर एकदा लाल पिशव्या आणि कॅन उचलले जातात. मात्र, 3 नंतर कचरा विल्हेवाटीसाठी आणला जात नाही. तो वॉर्डमध्येच ठेवला जातो. रविवारी हा कक्ष पूर्ण दिवस बंद असतो.