मुंबई - क्रूझवरील ड्रग पार्टी प्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज मुंबईतील सत्र न्यायालयात (एनडीपीएस कोर्ट) सुनावणी पार पडली. मात्र, आर्यन खान, अरबाझ मर्चंट आणि मूनमून धमेचा यांच्या जामीन अर्जांवर न्यायाधीश व्ही.व्ही. पाटील यांनी आपला निर्णय राखून ठेवला. 20 ऑक्टोबरला निर्णय देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे आता आर्यन खानचा मुक्काम 20 ऑक्टोंबरपर्यंत आर्थर रोड कारागृहात असणार आहे.
हेही वाचा - सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर कैजाद कपाडिया यांचे निधन, टायगर श्रॉफने वाहिली श्रध्दांजली
आज काय झालं कोर्टात -
ड्रग्ज पार्टीतील कारवाईत शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह, अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.व्ही. पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी दुपारी 12 वाजत होणार होती. आरोपीचे वकील आणि अन्य वकील कोर्टात उपस्थित होते, मात्र एनसीबीच्यावतीने युक्तिवाद करणारे एएसजी अनिल सिंह हायकोर्टात अन्य सुनावणीत व्यस्त असल्याने आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी उशिराने सुरू झाली. आज जवळजवळ 3 तासांहून अधिक काळ सुनावणी नंतर आर्यन खान, अरबाझ मर्चंट आणि मूनमून धमेचा यांच्या जामीन अर्जांवर न्यायाधीश व्ही.व्ही. पाटील यांनी निर्णय राखून ठेवला. २० ऑक्टोबरला निर्णय जाहीर करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
आर्यनच्या बाबतीत तपासात अनेक त्रुटी
आर्यन खानच्या जामीन अर्जावर एनसीबीचे वकील आणि आर्यन खानच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला. आर्यन खानचे वकील अॅड. अमित देसाई यांनी न्यायालयात आर्यन खानची बाजू मांडताना सांगितले की, आर्यनविषयी जे सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे की, तो आंतरराष्ट्रीय अमलीपदार्थ तस्करीत सहभागी आहे, याची सुतराम शक्यता नाही. व्हॉट्सअॅप संभाषणात रेव्ह पार्टीचा कुठेच उल्लेख नाही. आर्यन अनेक वर्षे परदेशात होता. इतर लोकांचा या प्रकरणात काय संबंध आहे, हे माहीत नाही, परंतु आर्यनचा या कथित कटाशी संबंध नाही. त्यामुळे, तपास संस्थेला त्यांचा तपास करू द्या, पण कोर्टाने जामीन अर्जाचा विचार करताना अशा सर्व मुद्द्यांचा विचार करावा. या शिवाय देसाई यांनी न्यायालयाला सांगितले की, एनसीबीकडून सांगण्यात आले की, आर्यनने त्याचा फोन त्याच्या स्वत:च्या इच्छेनुसार दिला, पण मी म्हणतो आर्यनचा फोन जप्त करण्यात आला, पण पंचनामामध्ये उल्लेख नाही. आर्यनच्या बाबतीत तपासात अनेक त्रुटी आहेत. त्याच्या विरोधात ठोस दाखवण्यासारखे काहीच नाही, त्यामुळे त्याला जामीन मंजूर करावा किंवा हवे तर त्याला कठोर अटी लावण्याची विनंती सुद्धा देसाई यांनी न्यायालयाकडे केली.
आर्यन खानवर गंभीर आरोप
एनसीबीच्या वकिलांनी आर्यन खानच्या जामीन अर्जाचा जोरदार विरोध करत, न्यायालयाला सांगितले की, त्यांच्याकडे असे अनेक पुरावे आहेत जे दर्शवतात की, आर्यन अनेक वर्षांपासून ड्रग्सचे सेवन करत आहे. एवढेच नाही तर, त्याने इतर देशांमध्ये सुद्धा ड्रग्सचे सेवन केले आहे. देशात आणि परदेशातील ड्रग्समुळे समाज आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना खूप मोठे नुकसान होत आहे, त्यामुळे आम्ही ही बाब गंभीरपणे घेत आहोत. तरुणांना या व्यसनातून मुक्त करण्यासाठी आणि या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एनसीबीचे अधिकारी दिवस - रात्र काम करत आहेत. आर्यन खान अशा लोकांच्या संपर्कात आहेत जे बेकायदेशीर खरेदी आंतरराष्ट्रीय ड्रग्स नेटवर्कचा हिस्सा आहे. सद्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. जर आर्यन खानला जामीन मिळाला तर तो देश सोडून जाण्याची शक्यता आहे.
20 ऑक्टोंबरपर्यंत कारागृहात आर्यनचा मुक्काम
आज आर्यन खानच्या जामीन अर्जावर न्यायालयाकडून कोणताही निर्णय न आल्यामुळे आर्यन खानला आता 20 ऑक्टोबरपर्यंत अर्थर रोड कारागृहात मुक्काम करावे लागणार आहे. कारण 15 ऑक्टोबर ते 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कामकाज बंद असणार आहे. यामुळे आता आर्यन खानला 20 ऑक्टोबर पर्यंत कारागृहातच राहावे लागणार आहे. आर्यन खान, अरबाझ मर्चंट आणि मुनमून धमेचा यांच्या जामीन अर्जांवर न्यायाधीश व्ही.व्ही. पाटील यांनी आपला निर्णय राखून ठेवला आहे.
हेही वाचा - मुंबई व नवी मुंबईत रिक्षा चोरी करणाऱ्याला अटक; चोरट्याकडून 9 रिक्षा जप्त