मुंबई : भारतीय रेल्वेने दिव्यांग व्यक्तींसाठी ( handicapped people ) सोयीची सेवा सुरू केली आहे. दिव्यांगजनांना फोटो ओळखपत्र जारी करण्याची प्रक्रिया डिजिटल करण्यासाठी मध्य रेल्वेने दिव्यांगजन मॉडेल सुरू केले ( Central Railway started Divyangjan Model ) आहे. पूर्वी, दिव्यांगजनांना फोटो ओळखपत्र देणे ही मॅन्युअल प्रक्रिया होती, परंतु आता दिव्यांगजन मॉडेल सह ज्यामध्ये अर्ज करण्यापासून फोटो ओळखपत्र जारी करण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल झाली आहे. दिव्यांगजनांना फोटो ओळखपत्रासाठी अर्ज करण्यासाठी प्रत्यक्षपणे विभागीय मुख्यालयात येण्याची गरज नाही. दिव्यांगजन आता भारतीय रेल्वेच्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करू शकतात.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे - भारतीय रेल्वेच्या संकेतस्थळावर गेल्यावर नोंदणी केल्यानंतर दिव्यांगांनी सवलत प्रमाणपत्र, फॉर्म, छायाचित्र, अपंगत्व प्रमाणपत्र, जन्मतारीख पुरावा, पत्ता आणि फोटो आयडी इत्यादी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, आवश्यक प्रक्रियेचे पालन केले जाईल आणि यशस्वी पडताळणी आणि मंजुरीनंतर फोटो ओळखपत्र डिजिटल स्वरूपात जारी केले जाईल.
दिव्यांगजनांचा त्रास वाचणार - दिव्यांगजन मॉडेल नुसार मध्य रेल्वेकडून लाखो लोकांना घरी बसून किंवा देशात कुठेही राहून फोटो ओळखपत्र जारी करता येणार आहे. भारतीय रेल्वेने दिलेल्या वेबसाईटवर त्यांनी त्या संदर्भातले कागदपत्र अपलोड करावे. यामुळे रेल्वेच्या मुख्यालयात येण्या-जाण्याचा त्रास वाचणार आहे. फोटो ओळखपत्र वेबसाइटवरून दिव्यांगजन डाउनलोड करून प्रिंट करू शकतात. दिव्यांगजन प्रवाशांनी याची नोंद घ्यावी व त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ईटीवी भारतशी बोलताना केले.
अपंगांच्या मागण्या प्रलंबित - भारतीय रेल्वेने देशभरासाठी ही सुरू केली योजनेचे स्वागत आहे. अपंगांना प्रत्येक लोकलचा एक डबा हा अपुर्ण आहे, त्याची देखील संख्या वाढवली पाहिजे. मात्र अद्यापही अपंग बांधवांच्या मागण्या प्रलंबित असल्याचे अपंग प्रवासी तसेच अपंग संस्थेचे प्रमुख रमाकांत पाटणकर यांनी सांगितले.