मुंबई - भारतीय रेल्वेत लागणारी साधनसामग्री पुरवठा करण्याचे टेंडर मिळवून देण्याचे आश्वासन देऊन तब्बल 2 कोटी 73 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनिट 11 ने ही कारवाई केली आहे. या प्रकरणातील पीडित तक्रारदाराला अटक आरोपींनी भारतीय रेल्वेमध्ये दोन डब्यांमध्ये लिकिंग करण्यासाठी लागणारे हॉर्स पाइपचे टेंडर मिळवून देतो असे आश्वासन देऊन त्यांच्याकडून वेळोवेळी तब्बल 2 कोटी 73 लाख रुपये घेतले होते.
मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने या अगोदर या प्रकरणी 3 आरोपींना अटक केली होती. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी हा भारतीय रेल्वेत कामाला असल्यामुळे त्याचा शोध मुंबई पोलीस घेत होते. सदरचा आरोपी अनिल कुमार माखनलाल अहिरवार (52) याला मध्य प्रदेशमधील ग्वालीयर येथून अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी अनिल कुमार माखनलाल अहिरवार हा भारतीय रेल्वेच्या इएम यू विभाग महालक्ष्मी येथे सिनियर सेक्शन इंजिनिअर या पदावर कार्यरत आहे. सदर आरोपी हा भारतीय रेल्वेमध्ये लागणाऱ्या विविध साहित्यासाठी निघणाऱ्या ई-टेंडर विभागात काम करत होता. या टेंडर प्रक्रियेची सर्व माहिती असल्यामुळे त्याने त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने अशा प्रकारचे बरेच गुन्हे केले असल्याचे समोर आले आहे.
तक्रार देऊ नये म्हणून पीडित व्यक्तीच्या विरोधात केले होते खोटे गुन्हे दाखल-
या प्रकरणातील पीडित तक्रारदाराला अटक आरोपीने पोलिसात तक्रार देऊ नये म्हणून भांडुप पोलीस ठाणे, अंधेरी कोर्टसारख्या ठिकाणी त्याच्याविरोधात खोट्या तक्रारी केल्या होत्या. अटक आरोपींनी बंगळुरू येथील एका व्यावसायिकाला अशाच प्रकारे दीड कोटी रुपयांचा चुना लावला असल्याचे समोर आले आहे. अटक आरोपींपैकी एका आरोपीने एका व्यक्तीस भारतीय रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केली असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
रेल्वेचे बनवले होते बनावट पर्चेस ऑर्डर
या प्रकरणातील आरोपी हा रेल्वेमध्ये सेक्शन इंजिनिअर या मोठ्या पदावर कामाला असून त्याने व त्याच्या साथीदारांनी तक्रादाराला हॉर्स पाईप हे कमी दरात व वेळेत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर तक्रारदारास भारतीय रेल्वेचा वॉटरमार्क असलेला व शिक्का मारलेला पर्चेस ऑर्डर देऊन 1 कोटी 44 लाख रुपये घेतले होते. काही दिवसानंतर आरोपींनी तक्रारदारास नागपूर व भुसावळ या ठिकाणी बोलावून घेतले होते. परंतु त्यावेळेस सदर त्यास कुठलाही माल दाखवण्यात आलेला नव्हता. मात्र, तक्रारदार यांच्या सह्या पर्चेस ऑर्डरवर घेऊन पुन्हा टेंडर निघाले आहे असे सांगून 72 लाख रुपये कमिशन म्हणून घेतले होते. पोलिसांनी याप्रकरणी सुभाष रमण सोलंकी(42) किरण पुरूषोत्तम चव्हाण (45) व मयूर विनोद सोलंकी (34) या आरोपींना अटक केली आहे. आरोपींची न्यायालयाने पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.