मुंबई - राज्यात पाकिस्तानचा कांदा आला तर आम्ही मार्केट जाळून टाकू, असा गंभीर इशारा राष्ट्रवादीचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. राज्यात पाकिस्तानातील कांदा आयात केला जाणार असून त्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी हा इशारा दिला आहे. यापूर्वी केंद्र सरकार कडून राज्यात पाकिस्तानातील साखर आयात करण्यात आली होती. त्यावेळी आम्ही गोदामे फोडली होती. आता कांदा जर आला तर मार्केट जाळून टाकू, असा इशारा त्यांनी एका ट्विटच्या माध्यमातून दिला आहे.
एकीकडे पाकिस्तानचा वापर धर्म द्वेषाचे राजकारण करण्यासाठी करायचे. तर दुसरीकडे पाकिस्तानचे हित जपण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना उध्वस्त केले जात असेल तर हे खपवून घेणार नाही. "पाकिस्तानचा वापर इथे धर्मद्वेषाचे राजकारण करण्यासाठी करायचा आणि इथल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मारून टाकण्यासाठी पाकिस्तानातून कांदा आणायचा. मागे साखर आणली होती तर गोदाम फोडले. आता कांदा आणला तर मार्केट जाळून टाकू" असा इशारा त्यांनी दिला आहे.
आव्हाड यांच्या ट्विटमुळे पाकिस्तानातून येणार्या कांद्याचे राजकारण राज्यात पेटण्याची शक्यता आहे. तसेच यासाठी विविध संघटना आणि राजकीय पक्षही पाकिस्तानच्या कांदा विरोधात उभे राहण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. दरम्यान, प्रदेश काँग्रेसनेही पाकिस्तानातून होत असलेल्या कांदा आयातीवर ट्विट करून जोरदार टीका केली आहे. काँग्रेसकडून करण्यात आलेले ट्विटमध्ये म्हटले आहे की, "इतरवेळी पाकिस्तानला शिव्या घालायच्या आणि दुसरीकडे पाकिस्तानचा कांदा आयात करायचा, हा भाजपचा दुतोंडीपणा आहे. कांद्याचे भाव वाढले तर शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे पडतील, परंतु भाजपला शेतकऱ्यांची चिंता नाही. हे सरकार शेतकरीविरोधी असून भाजपला फक्त व्यापाऱ्यांचीच चिंता जास्त आहे."