मुंबई - राज्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येने ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढली आहे. यातच जर लोकांनी शिस्त पाळली नाही, तर पुन्हा लॉकडाऊन करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी काल जनतेशी संवाद साधताना विरोधकांसह सहकारी पक्षांचेही कान टोचले. लोकल, मंदिर सुरू करा म्हणून आंदोलन करणारे वाचवायला येणार नाहीत, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला होता.
कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे
मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, औरंगाबाद, नाशिक या शहरांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत चालले आहे. कोरोनाचे नियम पाळा, असे आवाहन राज्य सरकारकडून केले जात आहे. मात्र, सर्वसामान्य जनतेकडून हे नियम पायदळी तुडवले जातात. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून 'नाईट कर्फ्यू' लावण्याचा विचार केला जात आहे आणि मुख्यमंत्र्यांकडून पुढील आठ दिवस राज्याच्या कोरोना वाढीवर लक्ष देऊन पुढे पूर्ण लॉकडाऊन करावा की, करू नये या संदर्भात आम्ही विचार करू, असे सांगाण्यात आले आहे.
मुंबईकरांनी कोरोनाला हलक्यात घेतले आहे का?
मुख्यमंत्र्यांच्या या संवादानंतर लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे, तर काहींनी या निर्णयाविरोधात आपली नाराजी व्यक्त करत, मुख्यमंत्र्यांनी लोकांना धमकावू नये, अशी प्रतिक्रिया दिली आहे. पण, मुंबईच्या बाजारात आणि स्टेशन परिसरात गर्दी ही काही कमी होण्याचे नाव घेत नाही. क्लिनअप मार्शल यांची नियुक्ती करून देखील लोक मास्कचा वापर करणे टाळत आहे आणि क्लिनअप मार्शल आणि सामन्य लोकांची भांडणे होत आहे. त्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुंबईकरांनी कोरोनाला हलक्यात घेतले आहे का? अस प्रश्न आत्ता उपस्थित होत आहे.