ठाणे - ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त आणि सध्या अज्ञातवासात असलेले परमबीर सिंह यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यांच्यावर एकामागे एक गुन्हे दाखल होत आहेत. परमबीर सिंह यांच्याविरोधात कोट्यवधी रुपयांच्या खंडणीचा गुन्हा कोपरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. याचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण तपास यंत्रणा म्हणजेच, सीआयडी करणार आहे.
हेही वाचा - Corona Update - 2 हजार 432 नवे रुग्ण, 32 रुग्णांचा मृत्यू
मुंबई आणि ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन उपायुक्त पराग मणेरे, बांधकाम व्यावसायिक संजय पुनमिया, व्यापारी सुनील जैन, मनोज घाटकर आणि इतर तीन अधिकाऱ्यांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. हा तपास आता सीआयडीकडे गेल्याने परमबीर सिंह यांच्या अडचणीत कमालीची वाढ झाली असून या प्रकरणी देखील चौकशी करिता हजर राहण्याचा समन्स सीआयडीकडून लवकरच बजावला जाणार आहे.
खंडणी प्रकारण काय आहे?
तत्कालीन ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या कार्यकाळात यूएलसी घोटाळ्याप्रकरणी एका बांधकाम व्यावसायिकाला ठाणे पोलिसांनी अटक केली होती. त्या बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई होणार होती. मात्र, मोक्का अंतर्गत कारवाई टाळण्यासाठी परमबीर सिंह, ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन उपायुक्त पराग मणेरे, सुनील जैन, संजय पुनामिया, मनोज घोटेकर यांनी ४ कोटी ६८ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप या बांधकाम व्यावसायिकाच्या नातेवाईकाने केल्यानंतर याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता हा तपास सीआयडी करणार आहे.
हेही वाचा - महाविकास आघाडी सत्तेत असतानाही पोटनिवडणुकीत भाजपचा वरचष्मा!