मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल होत असताना राज्यात कोरोनाने बदललेल्या डेल्टा प्लस या व्हेरियंटचे ६५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातच राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने निर्बंधांमध्ये शिथिलता दिल्यास येत्या काळात रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. रुग्णसंख्या आणि ऑक्सिजनची मागणी वाढताच राज्यात लॉकडाऊन लावण्यात येईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
दीड वर्षात ६३ लाख ६९ हजार रुग्णांना कोरोना -
राज्यात गेले दीड वर्ष कोरोनाचा प्रसार आहे. या प्रसारादरम्यान गेल्या दीड वर्षात ६३ लाख ६९ हजार २ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ६१ लाख ६६ हजार ६२० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८२ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत एकूण १ लाख ३४ हजार ३६४ मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी १ लाख १६ हजार १३७ चाचण्यांपैकी ६३ लाख ६९ हजार २ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने १२.७१ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,०१,३६६ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ६४,५७० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
डेल्टा प्लस रुग्णांचा आकडा ६५ वर -
राज्यात कोरोनाचे जिनोमिक सिक्वेंसिंग नियमित स्वरुपात करण्यात येत आहे. सीएसआयआरआयजीआयबी प्रयोगशाळेने आणखी २० डेल्टा प्लस रुग्ण शोधले असून, त्यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या डेल्टा प्लस रुग्णांची संख्या ६५ झाली आहे. नव्याने आढळलेले २० रुग्ण हे मुंबई ७, पुणे ३, नांदेड, गोंदिया, रायगड, पालघर प्रत्येकी २, चंद्रपूर आणि अकोला प्रत्येकी १ रुग्ण आढळून आले आहेत. या तपासणीतून राज्यात ८० टक्केहून अधिक नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळत असल्याचे दिसून येते आहे. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या ६५ डेल्टा प्लस रुग्णांपैकी ३२ पुरुष असून ३३ स्त्रिया आहेत. सर्वाधिक ३३ डेल्टा प्लस रुग्ण १९ वर्षे ते ४५ वर्षे वयोगटातील आहेत, तर त्या खालोखाल ४६ ते ६० वर्षे वयोगटातील १७ रुग्ण आहेत. यामध्ये १८ वर्षांखालील ७ बालके असून ६० वर्षांवरील ८ रुग्ण आहेत.
बेड्सची संख्या -
देशभरात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत आहेत. रुग्णांवर उपचार करता यावेत म्हणून डीसीएच, डीसीएचसी, सीसीसी, अवर्गीकृत अशा एकूण ६ हजार ८६९ ठिकाणी सुविधा उपलबध करून देण्यात आल्या आहेत. ४ लाख ५९ हजार २२६ आयसीयू नसलेले आयसोलेशनचे बेडस आहेत. कोरोना रुग्णासाठी ३ लाख ३३ हजार ३८९ आयसोलेशन बेड आहेत. संशयित रुग्णांसाठी १ लाख २५ हजार ७४४ बेड्स आहेत. १ लाख ११ हजार ३७७ ऑक्सिजन बेड्स आहेत. ३५ हजार १९ आयसीयू बेड, १३ हजार ६२८ व्हेंटिलेटर बेड आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.
तिसऱ्या लाटेची शक्यता -
राज्यात मागील वर्षी कोरोनाचा प्रसार सुरु झाला. हा प्रसार यावर्षी फेब्रुवारीमध्ये कमी झाला. कोरोनाची ही पहिली लाट होती. राज्यात फेब्रुवारीदरम्यान कोरोना रुग्ण पुन्हा वाढू लागले. यामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले. एप्रिल महिन्यात राज्यात निर्बंध कडक करत लॉकडाऊन लावण्यात आला. या निर्बंध आणि लॉकडाऊनमधून गेल्या काही दिवसांपासून टप्याटप्याने शिथिलता दिली जात आहे. सप्टेंबर महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता राज्य सरकारने निर्माण केलेल्या टास्क फोर्सने व्यक्त केली आहे. यामुळे राज्य सरकार आणि आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
४ कोटी ७५ लाख लाभार्थ्यांना लस -
राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरु आहे. १० ऑगस्टपर्यंत एकूण ४ कोटी ७५ लाख १ हजार ६६५ लाभार्थ्यांना पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. त्यामध्ये ३ कोटी ५२ लाख ६१ हजार ७८४ लाभार्थ्यांना पहिला तर १ कोटी २२ लाख ३९ हजार ८८१ लाभार्थ्यांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
...तर पुन्हा लॉकडाऊन -
'तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून एकूण उत्पादित होणारा लिक्विड मेडिकल ऑक्सिजन १३०० मेट्रिक टन आहे. त्यामध्ये आणखी २०० ते ३०० मेट्रिक टन वाढ केली जाईल. दरम्यान, ४५० पीएसए प्लांटची ऑर्डर देण्यात आली आहे. यापैकी १४१ प्लांटची सुरुवात प्रत्यक्षात झाली आहे. म्हणजेच ऑक्सिजन निर्मितीच्या कामाला सुरुवात झाली आहे. येत्या काळात १७०० ते २००० मेट्रिक टन उपलब्ध होऊ शकेल. तर ‘केंद्र शासनाने तिसऱ्या लाटेच्या संदर्भात सांगितले होते, की दुसऱ्या लाटेचा कालावधी ऑक्सिजनचा जो पिक होता; त्याच्या दीडपटीपर्यंतची व्यवस्था करा, असे सूचित केल्याच्या कारणाने जवळजवळ ३८०० मेट्रिक टनपर्यंत ऑक्सिजन लागू शकणार आहे. पण तिसऱ्या लाटेमध्ये ज्या दिवशी ७०० मेट्रिक टन दररोज लागेल. त्यावेळेस महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन ऑटोमोडमध्ये करण्यात येईल', असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.