पुणे - मुंबईसह पुण्यात आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. वादग्रस्त उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे, शिवसेनेचे पदाधिकारी, शिर्डी देवस्थानचे विश्वस्त राहुल कनाल तसेच सदानंद कदम यांच्या निवासस्थानी आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेच्या पूर्वी आयकर विभागाचे छापेमारी सुरू केली असून परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सीएच्या घरीही आयकर विभाग छापेमारी करत आहे.
पुण्यातील औंध भागातील बजरंग खरमाटे यांच्या घरी आयकर विभागाचे अधिकारी सकाळपासून तळ ठोकून आहेत. भाजप नेते किरीट सोमैया यांनी अनिल परब यांची बेनामी संपत्ती बजरंग खरमाटे यांच्या नावावर असल्याचा आरोप करुन काही दिवसांपूर्वी खरमाटेंच्या पुण्याजवळील भुगावमधील फार्म हाऊसवर छापा टाकला होता. त्यानंतर मंगळवारी (दि. 8 मार्च) आयकर विभागाने खरमाट यांच्या औंध येथील घरी छापा टाकला आहे.
काय आहेत आरोप - बजरंग खरमाटे हे पूर्वी नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन विभागामधील उप परिवहन अधिकारी होते. सध्या ते पुण्यातील आरटीओ कार्यालयात कार्यरत आहेत. तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांच्या जवळचे ते मानले जातात. मंत्री अनिल परब आणि अधिकारी बजरंग खरमाटे यांनी एकत्रित मिळून कोट्यवधीचा घोटाळा केला आणि नंतर ते पैसे आपापसात वाटून घेतले, असा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी पत्रकार परिषदेत केला होता.
तेव्हापासूनच बजरंग खरमाटे हे आयकर विभागाच्या रडारवर होते. त्यासोबत आरटीओमध्ये कार्यरत असल्याने बजरंग खरमाटे यांनी बदलीमध्येही मोठ्या प्रमाणात पैसे खाल्ले, असा खळबळजनक आरोपही सोमैया यांनी केला होता.
हेही वाचा - Nitesh Rane On Raid : राहुल कनाल नाईट लाईफ गॅंगचा सदस्य - नितेश राणे