मुंबई - शिवसेना नेते व मुंबई मनपा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या माझगाव येथील घरावर शुक्रवारी सकाळी सहा वाजता आयकर विभागाने छापा मारला आहे. आज सलग तिसऱ्या दिवशीही ( IT Raid On Yashwant Jadhav Home ) आयकर विभागाचे अधिकारी यशवंत जाधव यांच्या घरी ठाण मारून बसले आहेत. गेले दोन दिवस सतत शिवसैनिक जमा होऊन याचा निषेध म्हणून घोषणाबाजी करत आहेत. त्यांना अतिरेक करू नका आम्हाला काहीही होणार नाही असे आवाहन आमदार यामिनी जाधव यांनी केले आहे.
काय आहेत आरोप -
यशवंत जाधव यांच्या माझगावमधील दोन घरांबाबत प्राप्तिकर विभागाचे अधिकारी तपास करत आहेत. त्यासोबत यशवंत जाधव यांचे पीए, पालिकेतील कंत्राटदार यांच्या मुंबईतील एकूण २५ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. या मालमत्तांबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांचा तपास सुरू आहे. माझगाव, काळाचौकी, मालाड, बोरिवली, मुलुंड आदी ठिकाणी या धाडी प्राप्तिकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत. भाजप नेते माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर मनी लाँडरिंग आणि १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी केंद्रीय यंत्रणांकडे तक्रार केली होती. या अनुषंगाने या धाडी असल्याचे समजते. दरम्यान यशवंत जाधव यांच्यावर १५ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. ही रक्कम त्यांनी यूएईला हलवल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणीही चौकशी सुरू असल्याचे समजते.
![यशवंत जाधव](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-it-rade-7205149_27022022123129_2702f_1645945289_371.jpg)
अतिरेक करू नका -
यशवंत जाधव व यामिनी जाधव यांच्या घरावर इन्कम टॅक्सच्या धाडीमुळे शिवसैनिक संतप्त झाले असून जाधव यांच्या घराखाली जमा होत आहेत. शुक्रवारी सकाळी आणि रात्रीही शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. काल शनिवारी पुन्हा जाधव यांच्या घराबाहेर शिवसैनिक जमा झाले. त्यांना अतिरेक करू नका, सर्वांनी घरी जा. आम्ही जाधव कुटुंबीय सर्व सुखरूप आहोत, तुम्ही आमच्या सोबत आहात आम्हाला काहीही होणार नाही, असे आवाहन आमदार यामिनी जाधव यांनी केले आहे.
कोण आहेत यशवंत जाधव -
यशवंत जाधव हे शिवसेनेचे उपनेते आहेत. शिवसैनिक शाखाप्रमुख ते स्थायी समिती अध्यक्षपदापर्यंत त्यांनी पदे भूषवली आहेत. १९९७ मध्ये ते पहिल्यांदा महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. जाधव यांनी महापालिकेत अनेक महत्त्वाच्या समित्यांवर काम केले आहे. स्थायी समितीला मुंबई महापालिकेची तिजोरी समजली जाते. यशवंत जाधव यांच्याकडे अध्यक्ष या नात्याने गेले ४ वर्षे या पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आहेत. त्यांची पत्नी यामिनी जाधवही नगरसेविका होत्या. सध्या त्या शिवसेनेच्या आमदार आहेत.