मुंबई - बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी अत्यानंद होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले, हा सोनेरी अक्षरात लिहिला जाणारा क्षण आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवायला मिळाले हे माझे भाग्य आहे. आजचा हा कार्यक्रम म्हणजे दुग्धशर्करा योग आहे, अशी प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी दिली.
राज ठाकरे बाळासाहेबांच्या अंगाखांद्यावर खेळले आहेत. राज ठाकरे यांनी पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले आणि ते वेळेआधी हजर झाले होते. याचा अर्थ दोन्ही ठाकरेंमधील बंधूप्रेम कायम आहे, असेही त्या म्हणाल्या.
बाळासाहेब ठाकरे सर्वांशी मैत्रीपूर्वक वागल्यामुळे सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील आदी दिग्गज नेते उपस्थित होते. या गोष्टीचा आनंद आहे, असे त्या यावेळी म्हणाल्या.